भास्कर सोनवणे । इगतपुरीनामा न्यूज, दि. २२
गडकिल्ल्यांच्या चढाईचा रंग रक्तात अन नसानसात भरलेले इगतपुरी तालुक्यातील कळसुबाई मित्र मंडळाचे गिर्यारोहक ओळखले जातात. प्रत्येक सण उत्सवाला गडाची चढाई आणि सामाजिक उपक्रम यांचा मिश्र रंग हा असतोच. म्हणूनच हे गिर्यारोहक गेल्या २५ वर्षांपासून विविध सण गडकिल्ल्यांवर साजरे करीत असतात. रंगपंचमीच्या पर्वावर कळसुबाई मित्र मंडळाच्या गिर्यारोहकांना अलंग, मदन आणि कुलंग हा त्रिवेणीसंगम साधणारा रंग आवडला अन ठरलं…! आज रंगपंचमी निमित्ताने अतिशय अवघड असलेले कळसुबाई शिखराच्या पर्वत रांगेतील प्रसिद्ध अलंग, मदन, कुलंग या तिन्ही किल्ल्यांची १२ तासात चढाई, उतराई गिर्यारोहकांनी केली. मंडळाचे संस्थापक अध्यक्ष भगीरथ मराडे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली हा अनोखा विक्रम रंगतदार गिर्यारोहकांनी केला. यासह तिन्ही गडांवर निसर्गाच्या सानिध्यात रंगपंचमी सुद्धा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
कळसुबाई मित्रमंडळाच्या गिर्यारोहकांनी रासायनिक रंग, डीजे आणि झगमगाट यांना फाटा दिला. तरुणांना व्यसनापासून दूर राहण्याचा संदेश आणि तंदुरुस्त राहण्याचा संकल्प करण्याचे आवाहन मंडळाच्या गिर्यारोहकांनी अनोखा विक्रम करतांना केले. अनोख्या विक्रमाचे शिलेदार म्हणून कळसुबाई मित्र मंडळाचे गिर्यारोहक बाळासाहेब आरोटे, निलेश पवार, प्रवीण भटाटे, अशोक हेमके, बाळासाहेब वाजे, उमेश दिवाकर, संतोष म्हसणे, विनायक कडू, लक्ष्मण केकरे हे गिर्यारोहक कौतुकाला पात्र ठरले. मंडळाचे संस्थापक अध्यक्ष भगीरथ मराडे, शाहीर बाळासाहेब भगत, गजानन चव्हाण, प्रशांत येवलेकर, महेंद्र आडोळे आदी सदस्यांनी शिलेदारांचे पुष्पगुच्छ देऊन कौतुक केले. एकाच दिवशी तिन्ही अवघड किल्ले चढाई करणे अजिबात सोपे नसतांना केलेल्या विक्रमामुळे गिर्यारोहकांचे जिल्हाभर कौतुक करण्यात येत आहे.