
इगतपुरीनामा न्यूज – १६ फेब्रुवारीला रात्रीच्या सुमारास सिन्नर पोलीस ठाणे हद्दीत डिईएफ पेट्रोलपंपावर अज्ञात चार आरोपींनी पंपाचे कॅबीनमध्ये प्रवेश करून लाकडी दांडे व तलवारीचा धाक दाखवुन रोख ३० हजार ४७० रूपये जबरीने लुटमार केले होते. यासदर बाबत सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या घटनेनंतर २६ फेब्रुवारीला रात्रीकग्य सुमारास घोटी पोलीस ठाणे हद्दीत खंबाळे शिवारात श्रीहरी पेट्रोल पंपावर अज्ञात चार इसमांनी तोंडाला काळा कपडा बांधुन, हातात तलवारी व लाठ्या काठ्या घेवुन पंपावरील कर्मचाऱ्यांना तलवार व लाठ्याकाठ्यांचा धाक दाखवुन, मारहाण करून १८ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जबरीने चोरून नेला होता. याबाबत घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. ह्या घटनांचे गांभीर्य लक्षात घेता नाशिक ग्रामीणचे जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांनी घटनास्थळांना भेटी देवुन गुन्हे उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास सुचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजु सुर्वे यांच्या पथकाने दोन्हीही घटनांमधील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, फिर्यादी यांना विचारपुस करून सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी केली. यातील आरोपीनी परिधान केलेले कपडे, त्यांची देहबोली व बोलीभाषा यावरून गुप्त बातमीदारामार्फत माहिती घेतली असता यातील गुन्हेगार हे नाशिक शहरानजीकचे असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली होती.
त्यावरून तपासाची चक्रे फिरवुन पथकाने माडसांगवी, ता. जि. नाशिक येथून अमोल शरद माळी, वय २५, संदीप बाळु खांदवे, वय २५, महेश अंकुश ससाणे उर्फ सोनु, वय १९, रविंद्र शंकर इंगळे, वय २३, एक विधीसंघर्षितग्रस्त, सर्व रा. माडसांगवी, ता. जि. नाशिक या संशयितांना ताब्यात घेतले. तपासाचे कौशल्य वापरून सखोल चौकशी केली असता, त्यांनी सिन्नर, ब्राम्हणवाडे, खंबाळे, लाखलगाव येथील पेट्रोलपंपांवर रात्रीच्या वेळी प्रवेश केला. पंपावरील कर्मचाऱ्यांना तलवार व लाठ्याकाठ्यांचा धाक दाखवुन, मारहाण करून जबरी लुटमारी केल्याची कबुली दिली. यातील आरोपी अमोल माळी याने चांदोरी, ता. निफाड परिसरातुन एक दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली आहे. आरोपींच्या कब्जातुन गुन्हे करण्यासाठी वापरलेली लाल रंगाची हयुंदाई आय-२० कार एमएच ०३ बीडब्ल्यु ०५४३, एक चोरीची स्प्लेंडर एनएक्सजी मोटर सायकल, एक तलवार व गुन्ह्यात वापरलेले मोबाईल फोन असा ५ लाख ८२ हजार किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. आरोपी अमोल माळी, संदीप खांदवे हे सराईत गुन्हेगार असुन त्यांच्यावर यापुर्वी आडगाव पोलीस ठाण्यात जबरी चोरी व घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. आरोपींनी कबुली दिल्यावरून सिन्नर, घोटी सायखेडा, आडगाव नाशिक शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे उघडकीस आलेले आहे. सर्व आरोपींना घोटी पोलीस ठाण्यातील गुन्ह्यात अटक करण्यात आली असुन पुढील तपास सुरु आहे. यांच्याकडून जबरी चोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजु सुर्वे, सपोउनि नवनाथ सानप, पोलीस अंमलदार विनोद टिळे, प्रशांत पाटील, सुधाकर बागुल, सतिष जगताप, हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम, प्रविण गांगुर्डे यांच्या पथकाने ५ गुन्हे उघडकीस आणुन कामगिरी केली आहे.