इगतपुरीनामा न्यूज, दि. ७
मेसचे कॉन्ट्रॅक्ट देण्यासाठी डीडी काढण्यासाठी इगतपुरीला बोलावून १२ हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या संशयित अट्टल आरोपीला इगतपुरी पोलिसांनी अंबड सातपूर येथील राहत्या घरून जेरबंद केले आहे. संबंधित आरोपीवर विविध पोलीस ठाण्यांमध्ये आतापर्यंत फसवणूक आणि अन्य असे ९ पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. इगतपुरी पोलिसांनी अट्टल आरोपीस ताब्यात घेतल्याने त्यांच्या कामगिरीचे कौतुक करण्यात येत आहे. या कामगिरीमुळे जिल्हयातील अनेक फसवणुकीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, संशयित आरोपी रोहिदास रामचंद्र भामरे वय ५६ रा. नाशिक याने फिर्यादी वैभव संतोष लकडे, वय 22 वर्षे, व्यवसाय- खानावळ मेस, रा. टिव्ही सेंटर, एम-2 रोड नं.9 हुडको, औरंगाबाद यांना इगतपुरी येथे बोलावुन घेतले. मेसचे कॉन्ट्रॅक्ट देण्यासाठी ही भेट ठरवली गेली. ह्या कामासाठी रोहिदास भामरे याने फिर्यादी वैभव लकडे आणि साक्षीदार आकाश राठोड रा. औरंगाबाद इगतपुरी कोर्ट याला बँकेत डीडी काढण्यासाठी इगतपुरी येथील स्टेट बँक शाखेत जाऊन थांबण्यास सांगितले. यावेळी मेस कॉन्ट्रॅक्टसाठी आणलेली 12 हजाराची रोख रक्कम संतोष लकडे हे आकाश राठोड याच्याकडे देवुन बँकेत निघुन गेले. त्यावेळी आरोपी रोहिदास भामरे याने याने आकाश राठोड याला आधारकार्डची झेरॉक्स काढण्यास सांगितले. मी कागदपत्र तयार करतो तु झेरॉक्स घेवुन ये असे सांगुन त्याचे कडील रोख 12 हजार रुपये रक्कम घेवुन आरोपी रोहिदास भामरे पळुन गेला.
याबाबत इगतपुरी वैभव संतोष लकडे यांनी इगतपुरी पोलिसांकडे ४ सप्टेंबरला फिर्याद दाखल केली. इगतपुरी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. नाशिक ग्रामीणचे पोलीस अधिक्षक सचिन पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक शर्मीष्ठा वालवलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली इगतपुरीचे पोलीस निरीक्षक वसंत पथवे यांनी त्यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक डी. डी. पाटील, पोलीस उपनिरीक्षक आर. एल. दिवटे, टी. आर. साळुंखे, सचिन बेंडकुळे, आबासाहेब भगरे यांचे मदतीने तपास सुरू केला. पोलीस निरीक्षक वसंत पथवे यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमीनुसार आरोपी रोहिदास रामचंद्र भामरे हा नाशिक येथे असल्याचे समजले. गुप्त बातमीदाराकडुन बातमी मिळाल्याने पथकातील पोलीस उपनिरीक्षक आर. एल. दिवटे, टी. आर. साळुंखे, सचिन बेंडकुळे, आबासाहेब भगरे यांनी मिळून सातपुर अंबड येथे जावुन आरोपी रोहिदास रामचंद्र भामरे वय 56, रा. भोर टाऊनशिप, जाधव संकुल शेजारी चुंचाळे शिवार, सातपुर अंबड नाशिक येथुन त्याला ताब्यात घेतले. आरोपीला विश्वासात घेवुन विचारपुस केल्यावर त्याने गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास इगतपुरीचे पोलीस निरीक्षक वसंत पथवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक तुषार साळुंखे करीत आहेत.
संशयित आरोपीवर नाशिक जिल्ह्यात खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.
1 ) अंबड पोलीस स्टेशन :- गुरनं. 113/2009भादवि कलम 354, 323 प्रमाणे
2 ) सरकारवाडी पो. स्टे :- गुरनं. 42/2018 भादवि कलम 420, 465 प्रमाणे
3 ) पिंपळगाव बसवंत पो. स्टे :- गुरनं. 91/2019 भादवि कलम 420, 467, 471 प्रमाणे
4 ) पिंपळगाव बसवंत पो. स्टे :- गुरनं. 28/2019 भादवि कलम 420, 467, 471 प्रमाणे
5 ) नाशिक कोर्टात 138 प्रमाणे 05 गुन्हे दाखल आहेत.