
इगतपुरीनामा न्यूज – छत्रपती शिवाजी महाराज की जय.. जय शिवराय.. जय भवानी… जय जिजाऊ.. हर हर महादेव आदी उत्स्फूर्त घोषणा..भगव्या रंगाच्या वेशभुषेतील जनसमुदाय.. भगव्या पताका आणि झेंडे हाती धरून शिवरायांचा घोष करणारी तरुणाई ह्या जल्लोषाच्या शिव जन्मोत्सवात सहभागी झाली. इगतपुरी, घोटी, टाकेद, धामणगाव, साकुरफाटा, गोंदे, वाडीवऱ्हे, नांदगाव सदो, माणिकखांब, वैतरणा आदी गावांसह इगतपुरी तालुक्याच्या कानाकोपऱ्यात शिवजयंती प्रचंड उत्साहात साजरी केली जात आहे. शाळांमध्ये विविध कार्यक्रम घेतले जात असून विविध स्पर्धा संपन्न होत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यावर आधारित भाषणे, सांस्कृतिक कार्यक्रम, पोवाडे, गाणी, नृत्य, निबंध आदी स्पर्धा संपन्न झाल्या. माणिकखांब येथील रियांश हरिष चव्हाण, मितांश संदीप चव्हाण ह्या चार वर्षीय बालकांनी माणिकखांब येथे बाल शिवरायांची वेशभूषा करून उपस्थित जनसमुदायाचे लक्ष वेधून घेतले. राजेशाही थाटात आपल्या बोबड्या बोलीत छत्रपती शिवरायांच्या घोषणा दिल्या. इगतपुरी तालुक्यात आज सर्वत्र गावागावात शिवजयंतीचे दिमाखदार कार्यक्रम होणार आहेत.