
इगतपुरीनामा न्यूज – टाकेद बुद्रुक येथील विद्यार्थिनीवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा द्यावी. पीडित मुलीच्या शिक्षणाचा खर्च व मान्य केलेली १५ लाखांची रक्कम तात्काळ मुलीच्या खात्यावर जमा करावी. ज्या दिवशी ही काळीमा फासणारी घटना घडली त्या घटनेच्या दिवशी फरार झालेल्या ६ शिक्षकांचे निलंबन करावे, यापुढे महिला आणि मुलींच्या बाबत तक्रार आल्यास त्यावर सत्वर लक्ष घालावे. आदी मागण्या पूर्ण न झाल्यास रास्तारोको व तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय युवा अध्यक्ष तथा आदिवासी काँग्रेस कमिटीचे प्रदेश उपाध्यक्ष लकीभाऊ जाधव यांनी दिला. इगतपुरी तालुक्यातील टाकेद बुद्रुक माध्यमिक शाळेत अल्पवयीन आदिवासी विद्यार्थिनीवर अत्याचार करणारा मुख्याध्यापक व त्याला मदत करणाऱ्या शिक्षकाला फाशी देण्याच्या मागणीसाठी लकीभाऊ जाधव यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांचा विराट मूक मोर्चा काढण्यात आला. इगतपुरी तहसील कार्यालयावर हा मुक मोर्चा काढण्यात आला. बोरटेंभे पासून इगतपुरी तहसीलदार कार्यालय अशा विराट मुक मोर्चात नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. या विराट मूक मोर्चात राष्ट्रीय काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, शिवसेना, एल्गार कष्टकरी संघटना, वंचित बहुजन, रिपाई यांच्यासह मोर्चात पीडित मुलीच्या कुटुंबासहित सर्व आदिवासी संघटना, सकल हिंदू समाज, सर्वपक्षीय संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी तहसीलदार कार्यालयात निवेदन देऊन राज्य शासनाला हे निवेदन तात्काळ पाठवण्यात यावे असे सांगण्यात आले. टाकेद बुद्रुक न्यु इंग्लिश स्कुलच्या ६ वीत शिकणाऱ्या १३ वर्षीय बालिकेवर ७ फेब्रुवारीला मुख्याध्यापक तुकाराम साबळे ह्या नराधमाने अमानवीय शिक्षक गोरक्षनाथ जोशीच्या मदतीने अत्याचार केला. संबंधित आरोपी अटक असले तरी इतरही काही आरोपी किंवा अशा अनेक घटना ह्या शाळेत घडलेल्या असु शकतात. त्यामुळे सदर गुन्ह्याची पाळेमुळे शोधुन संबंधित सर्व गुन्हेगारांना कठोर शिक्षाची फाशी द्यावी. अनुभवी आणि कार्यतत्पर सरकारी वकीलाची नेमणुक करून हा खटला फास्ट ट्रॅक चालवावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय युवा अध्यक्ष तथा आदिवासी काँग्रेस कमिटीचे प्रदेश उपाध्यक्ष लकीभाऊ जाधव, भगवान मधे, किरण फलटणकर, मोहन बऱ्हे, तुकाराम वारघडे, काशिनाथ कोरडे, आकाश पारख, भाऊसाहेब खातळे, विनोद भागडे, दीपक गायकवाड, किरण मुसळे आदी सर्वपक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.