
लक्ष्मण सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील बेलगाव कुऱ्हेचे शेतकरी राजू बोराडे यांची अस्वली स्टेशन जवळ उत्कृष्ठ गुलाबांची पाच वर्षांपासून शेती आहे. यावर्षी १७ गुंठ्यात नवीन गुलाब वाणाची निवड करून गुलाब शेतीचा प्रयोग त्यांनी यशस्वी केला आहे. त्यांनी कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ न घेता स्वतःच्या बळावर गुलाबांची आधुनिक शेती यशस्वी केली आहे. व्हॅलेंटाईन डे निमित्ताने त्यांच्या गुलाबाला प्रति बंच ४३० प्रमाणे दिल्लीच्या फुल बाजारात विक्रमी बाजारभाव मिळाला. त्यांनी आतापर्यतच्या बाजारभावाचा स्वतःचा विक्रम मोडीत निघाल्याने आनंद व्यक्त केला. त्यांच्या गुलाबाला कानपुर, नागपूर, मुंबई, इंदोर येथे प्रचंड मागणी आहे. बेलगाव कुऱ्हेच्या दर्जेदात गुलाबाचा राजधानी दिल्लीत बोलबाला झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी राजू बोराडे यांचे अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या.
गेल्या वर्षी दिल्लीच्या फुल बाजारात त्यांच्या गुलाबाला प्रति बंच १८० ते २०० भाव मिळत होता. ठिबक सिंचनाचे व्यवस्थापन असणाऱ्या गुलाब शेतीतून चाळीस दिवसांनी फुले तोडणीला येतात. या पिकाची एकदाच लागवड केली जात असल्याने वारंवार लागवडीचा खर्च येत नाही. पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे येथून गुलाबाची रोपे आणतात. सायकल पद्धतीने ४५ दिवसांनी गुलाब येतो. फुलांचे व्यापारी नियोजन पाठवतात त्याप्रमाणे मुहूर्त साधून विक्री होते. लग्नसराई असो वा कोणतेही सण उत्सव असो यामध्ये गुलाबाला खूप मागणी असते. त्यामुळे गुलाब शेती फायदेशीर ठरते आहे. या शेतीत ४० टक्के खर्च नफा ६० टक्के मिळतो. या कामात राजू बोराडे यांना चुलत भाऊ संजय आणि विजय बोराडे यांचे मार्गदर्शन लाभले. वडील कै. लक्ष्मण बोराडे यांचा आशीर्वाद, आई गंगुबाई यांची प्रेरणा घेऊन शेती करीत असल्याचे राजू बोराडे यांनी सांगितले. त्यांची पत्नी योगिता त्यांना शेतीत मदत करते. विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळण्यासाठी या ठिकाणी शाळेच्या सहलीद्वारे माहिती घेतली जाते.