
इगतपुरीनामा न्यूज – पावसाळ्याच्या आधी नांदूरवैद्य येथील शिवरस्त्याच्या कामाला गती मिळून काम मार्गी लागावे, यादृष्टीने इगतपुरीचे तहसीलदार अभिजित बारवकर यांना नांदूरवैद्य ग्रामस्थांनी नुकतेच निवेदन दिले. नाशिक येथील संरक्षण विभागाच्या फिल्ड फायरिंग रेंज लगत जाणारा नांदुरवैद्य गाव ते अस्वली बेलगाव रस्त्याला मिळणारा, नकाशावरील परंतु वापरात नसलेल्या शिवरस्त्यासाठी नांदुरवैद्य ग्रामस्थ्यांनी केलेल्या प्रयत्नांना खासदार राजाभाऊ वाजे यांचे बळ मिळाले आहे. त्याचप्रमाणे नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी ह्या शिवरस्त्यासाठी पुढाकार घेत संरक्षण खात्याशी संपर्क साधून इतर सर्व संबंधित विभागांचा खास बैठकीद्वारे समन्वय घडवून आणला. त्यानुसार इगतपुरीचे तहसीलदार अभिजित बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या शिवरस्त्याचे काम कार्यान्वित झालेले आहे. रस्त्याच्या प्राथमिक मोजणीचे काम संरक्षण विभागाने सुरु केले. परंतु संरक्षण विभाग अधिकाऱ्यांच्या व्यस्ततेमूळे काम रखडले आहे. त्यामुळे हद्दीखुणा देण्याचे काम अनिश्चित काळासाठी लांबणीवर पडले. पावसाळ्याच्या आधी ह्या शिवरस्त्याच्या कामाला गती मिळावी अशी मागणी मोहन करंजकर, शिवपाणंद शेतरस्ता चळवळीचे इगतपुरी तालुका समन्वयक राधारमण दवते, गणेश मुसळे, सुखदेव काजळे, रवींद्र यंदे, नवनाथ मुसळे, सुखदेव दिवटे आदींनी निवेदनाद्वारे केली. तहसीलदार अभिजित बारवकर यांनी निवेदनानुसार सकारात्मक प्रतिसाद देऊन ग्रामस्थांच्या मागणीनुसार कार्यवाही करण्यात येईल असे सांगितले.