
भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील टाकेद बुद्रुक येथील सहावीच्या विद्यार्थिनीवर शाळेच्या नराधम मुख्याध्यापकाने शिक्षकाच्या मदतीने अत्याचार घडल्याने सर्वत्र संतापाचे वातावरण आहे. १३ वर्षीय पीडित विद्यार्थिनीचे ‘बदलापूर” येथे घडलेल्या घृणास्पद घटनेशी कनेक्शन असल्याचे समजले आहे. पीडित विद्यार्थिनी बदलापूर येथील शाळा सोडून टाकेद बुद्रुक शाळेत जुनपासून शिकत आहे. पीडित मुलगी आणि तिच्या कुटुंबाशी एल्गार कष्टकरी संघटनेच्या सुरेखा मधे यांनी संवाद साधल्यावर ही बाब ध्यानात आली आहे. घटनेच्या मुळाशी जातांना संबंधित बदलापूरच्या शाळेतही पीडित विद्यार्थिनीला त्रास झाला किंवा कसे याबाबत प्रशासनाने तातडीने चौकशी करावी अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून करण्यात आहे. टाकेद बुद्रुक येथील संबंधित शाळेत आपल्या विद्यार्थिनी पाठवायला सध्याच्या परिस्थितीत पालक धास्तावले आहेत. अशा आणीबाणीच्या काळात पालकांशी चर्चा करून आधार आणि मुलींचे समुपदेशन करण्यासाठी एल्गार कष्टकरी संघटनेच्या महिलांनी पुढाकार घेतला. सर्वांशी भेटीगाठी घेऊन एल्गारच्या महिलांनी दिलासा देऊन भक्कमपणे पाठीशी असल्याचे सांगितले.
मुख्याध्यापकाने शिक्षकाच्या मदतीने अत्याचार झालेली टाकेद बुद्रुक शाळेत शिकणारी पीडित १३ वर्षीय विद्यार्थिनी बदलापूर घटनेपूर्वी तिथेच एका शाळेत शिकत होती. मात्र त्या बदलापूरला झालेली निंदनीय अत्याचाराची घटना राज्याची झोप उडवणारी ठरली. ह्या पार्श्वभूमीवर पीडित विद्यार्थिनीच्या धास्तावलेल्या पालकांनी तिला जुन महिन्यात टाकेद बुद्रुक शाळेत टाकले. बदलापूर घटनेचा फुफाटा विद्यार्थिनीसाठी घातक असल्याचे समजून पालकांनी तिला सुरक्षितपणे गावी आणले. मात्र ती पीडिता विद्यार्थिनी मुख्याध्यापक आणि शिक्षकाने केलेल्या अत्याचाराच्या आगीत जाऊन पडली. याबाबत एल्गार कष्टकरी संघटनेच्या सुरेखा मधे यांना तिच्या कुटुंबियांनी घटनाक्रम सांगितला. यावेळी मंगल खडके, मथुरा भगत, गणपत गावंडे, रामचंद्र खडके उपस्थित होते. आम्ही आणि संपूर्ण प्रशासन पीडित कुटुंबाच्या सोबत आहे. विद्यार्थिनी ह्या उद्याच्या भविष्य असल्याने त्यांच्या शैक्षणिक विकासासाठी, सुरक्षिततेसाठी कायम सोबत असल्याचा शब्द सुरेखा मधे यांनी दिला. पीडित मुलीला बदलापूरच्या शाळेतून इकडच्या शाळेत टाकले असल्याचे मुख्याध्यापकाला माहित होते. त्यानुसार त्याने आधीच्या शाळेतील ह्या विद्यार्थिनीबाबत गैरफायदा घेतला की काय? बदलापूर शाळेत ह्या मुलीला त्यावेळी काही त्रास झाला आहे का? याबाबत योग्य चौकशी होणे गरजेचे आहे. प्रस्तुत प्रकरणी लवकरच जिल्हाधिकारी यांना भेटून चर्चा करणार आहे असे सुरेखा मधे यांनी सांगितले.