इगतपुरीनामा न्यूज, दि. ३ – महाराष्ट्राचे कुळदैवत खंडेराव महाराज यात्रेला येत्या माघ पोर्णिमेनिमित्त इगतपुरी तालुक्यातील भाविकांचे श्रद्धास्थान रामराव नगर येथील खंडेराव महाराज मंदिर येथे सुरवात झाली आहे. तालुक्यातील नवसाला पावणारा खंडोबा अशी ख्याती असलेले हे मंदिर आहे. याठिकाणी खंडेराव महाराज यांची यात्रोत्सव सुरू होत असून तीन दिवस चालणाऱ्या यात्रेमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आजपासून सुरु झालेल्या यात्रेमध्ये हरिभजन कार्यक्रम, शनिवारी रात्री सप्तशृंगी गायन पार्टी, गिरणारे यांचे खंडोबाची गाणी हा कार्यक्रम होणार आहे. रविवारी दुपारी १२ ते ५ या वेळेत शिवमल्हार मित्रमंडळाच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन केले आहे. दुपारी ३ ते ५ या वेळेत खंडेराव महाराजांच्या चांदीच्या मूर्तीची बैलगाडीतून संपूर्ण घोटी शहरातून मिरवणूक असणार आहे. रात्री ९ ते १२ या वेळेत झी टॉकीज फेम विनोद सम्राट बालकीर्तनकार हभप चैतन्य महाराज राऊत (आळंदीकर) यांचे हरिकीर्तन होणार आहे.
यात्रेतील तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे नियोजन करण्यासाठी व यात्रा शांततेत पार पडावी यासाठी माजि पंचायत समिती सदस्य संतोष दगडे व शिव मल्हार मित्रमंडळाचे असंख्य कार्यकर्ते अहोरात्र परिश्रम घेत आहे. यात्रे निमित्त यंदा संपूर्ण मंदिराला रंगरंगोटी केली असून मंदिरापुढील दीपमाळ लखलख करीत कार्यक्रमांची सुरवात झाली आहे. मंदिरावर मन मोहून टाकणारी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. विविध प्रकारच्या खेळणी तसेच नारळ प्रसाद, खाऊचे दुकाने, चायनीज स्टॉल यात्रेत दाखल झाले आहेत. यात्रे निमित्त घोटी रामराव नगर येथे रहाट पाळणे दाखल झाले आहे. यावर्षी हा यात्रौत्सव भाविकांच्या अलोट गर्दीने फुलून जाणार आहे. इगतपुरी तालुक्याच्या विविध भागातील भाविकांचे हे श्रद्धास्थान असल्याने गर्दी वाढत आहे.