
इगतपुरीनामा न्यूज – टाकेद बुद्रुक येथील माध्यमिक शाळेचा नराधम मुख्याध्यापक व शिक्षकाने सहावीतल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या घटनेने पूर्ण तालुका आणि जनमाणसे हादरून गेले आहेत. ह्या घृणास्पद घटनेने शिक्षण क्षेत्र आणि माणुसकीला मान खाली घालायला लागली आहे. अशा क्लेशदायक घटना पुन्हा पुन्हा घडू नये म्हणून हे जलदगती न्यायालयात चालवावे. कसून तपास करून दोन्हीही नराधम आरोपींना मरेपर्यंत फाशीची शिक्षा द्यावी. इगतपुरी तालुक्यातील शिक्षण खात्याला शिस्त लावावी. बेशिस्त शिक्षक व अधिकाऱ्यांची अन्यत्र बदली करावी अशी आग्रही मागणी शेतकरी नेते नारायण राजे भोसले यांनी केली आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या कुटुंबाला संरक्षण द्यावे. शासकीय मदतीचा हातभार द्यावा आदी मागण्या राज्याचे कृषिमंत्री ना. माणिकराव कोकाटे आणि शिक्षणमंत्री दादा भुसे, शिक्षण आयुक्त, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, तहसीलदार, घोटी पोलीस ठाणे यांच्याकडे करण्यात येणार असल्याचे श्री. नारायण राजे भोसले यांनी सांगितले. पीडितेला न्याय न मिळाल्यास इगतपुरी तालुक्यात सर्वपक्षीय पदाधिकारी आणि जनता आक्रोश आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा देण्यात आला आहे.