चांगला आहार मिळाल्यास क्षयरोगावर मात करणे शक्य : डॉ. विश्वनाथ खतेले : बेलगाव कुऱ्हे प्राथमिक आरोग्य केंद्रात राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण जनजागृती

इगतपुरीनामा न्यूज – क्षयरोग दुर्धर आजाराचा उपचार सहा महीने प्रदिर्घ आहे. उपचारादरम्यान चांगला आहार मिळाल्यास प्रतिकार शक्ती वाढून आजारावर मात करणे शक्य आहे. समाजातील दानशूर व्यक्तींनी क्षयरोग रुग्णांसाठी पुढाकार घेऊन मदत करावी असे आवाहन बेलगाव कुऱ्हे प्राथमिक आरोग्य केंद्राचे  वैद्यकीय अधिकारी डॉ. विश्वनाथ खतेले यांनी केले. इगतपुरीचे तालुका वैद्यकीय अधिकारी एम. बी. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली बेलगाव कुऱ्हे प्राथमिक आरोग्य केंद्रात राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी जनजागृती वेळी डॉ. विश्वनाथ खतेले बोलत होते. यावेळी डॉ. वैशाली गायकवाड यांनी काळजी घेण्याबाबत मार्गदर्शन केले. गोरगरीब आदिवासी रुग्णांना येथील प्राथमिक आरोग्य केंद्र आरोग्य सेवा देण्यास सक्षम ठरत आहे. हे अभियान १०० दिवसांचे असून आरोग्य केंद्राने क्षयरोगाच्या निर्मुलनासाठी जनजागृती सुरू केली आहे. अभियानात क्षयरोग संशयीत रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यात गुप्त पद्धतीने सापडलेल्या रुग्णांवर मोफत उपचार सुरू असल्याचे डॉ. खतेले यांनी सांगितले. मजुरी करून आपल्या पोटाची खळगी भरणाऱ्या रुग्णांची परिस्थिती अत्यंत गरिबीची असून आजारपणामुळे ते काम करू शकत नाहीत. त्यानंतर ह्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती ढासळते.  त्यांना योग्य उपचार व आहार मिळण्यासाठी अडचणी निर्माण होतात. ह्या रुग्णांना चांगला आहार व उपचार मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. क्षयरोग जनजागृती अभियानात प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्यसेवक कर्मचारी परिश्रम घेत आहेत.

Similar Posts

error: Content is protected !!