
इगतपुरीनामा न्यूज – नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ संचालित इगतपुरी येथील कला व वाणिज्य महाविद्यालयातर्फे राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत विशेष श्रमसंस्कार शिबीर फांगुळगव्हाण येथे संपन्न झाले. १९ ते २५ जानेवारी या कालावधीत आयोजित ह्या शिबीरात युथ फॉर माय भारत युथ फॉर डिजिटल लिटरसी या संकल्पनेवर आधारित विविध उपक्रम राबविण्यात आले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजना आणि कला व वाणिज्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने हे विशेष श्रमसंस्कार शिबीर पार पडले. विद्यार्थ्यांनी गावातील मुख्य रस्ते मंदिराचा परिसर आणि विविध भागात साफसफाई करून वृक्षारोपण केले. सांडपाणी व प्लास्टिक कचऱ्याचे व्यवस्थापन करून विहिरीसह इतर पाण्याच्या स्रोतांची स्वच्छता केली. लेक वाचवा लेक शिकवा, मतदार जाणीवजागृती, बालविवाह प्रतिबंध, आर्थिक साक्षरता आदी वेगवेगळ्या विषयावर आधारित रॅली काढण्यात आली. ई-बुक, ई-लायब्ररी, ऑटोमेशन,आर्थिक विकास आणि युवकांची मानसिकता, स्पोर्ट अँप्स अँड फिटनेस, डिजिटल लिटरसी पत्रकारिता आणि करिअर, सायबर क्राईम आणि कायदा, व्यसनमुक्ती, योगा व ध्यानधारणा या विषयावर तज्ञ वक्त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शिबिराच्या उदघाटन प्रसंगी महाविद्यालय विकास समितीचे रमेश राठी, योगेश भडांगे, पत्रकार भास्कर सोनवणे, सरपंच गणेश म्हसणे, आतिष पंडित, सचिन म्हसणे, देवराम म्हसणे, धनराज म्हसणे, प्राचार्या प्रतिभा हिरे, कार्यक्रम प्रमुख प्रा. कासार, प्राध्यापक, विद्यार्थी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. शनिवारी २५ जानेवारीला शिबिराच्या समारोपप्रसंगी संस्थेचे कार्याध्यक्ष मारुती कुलकर्णी, मनःशांती व्यसनमुक्ती केंद्राचे प्रमुख हुकूमचंद पाटील, बोराडे, ॲड. सुनील लहाने, महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रतिभा हिरे, समन्वयक बाळू घुटे प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी विद्यार्थी व गावकरी उपस्थित होते.