
इगतपुरीनामा न्यूज – सर्वत्र रक्ताचा तुटवडा असल्याने मोठी वाचू शकणाऱ्यांचा प्राण धोक्यात आलेला आहे. रक्ताचे संकलन होणे काळाची गरज असून यामुळे अनेकांचे प्राण वाचवण्यासाठी हातभार लागतो. केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे प्रदेशाध्यक्ष तथा केमिस्ट हृदयसम्राट जगन्नाथ शिंदे यांच्या अमृतमहोत्सवी ७५ व्या वाढदिवसानिमित्त राज्यभर ७५ हजार रक्त पिशव्या जमा करण्याचा कार्यक्रम आज संपन्न झाला. त्यानुसार नाशिक जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे सचिव रामदास गव्हाणे यांच्या नेतृत्वाखाली तालुकाध्यक्ष कुमारपाल चोरडिया यांच्या अध्यक्षतेखाली आणि तालुका उपाध्यक्ष प्रसाद शेलार यांच्या सहकार्याने आज घोटी येथे अभूतपूर्व रक्तदान शिबीर पार पडले. गरजू रुग्णांसाठी रक्त कमी पडू नये यासाठी असोसिएशनने रक्तदान करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला घोटी परिसरातून प्रचंड प्रतिसाद मिळाला. इगतपुरी तालुक्याच्या इतिहासात पहिल्यांदा एकाचवेळी १४५ जणांनी रक्तदान केले. अक्षरशः रिकाम्या रक्त पिशव्या संपल्याने २५ पेक्षा जास्त रक्तदात्यांना माघारी परतावे लागले. जिल्हा शासकीय रुग्णालय अंतर्गत मेट्रो ब्लड बँकेच्या मदतीने हा उपक्रम ऐतिहासिक ठरला. या सामाजिक बांधिलकीच्या कामगिरी बद्धल असोसिएशनचे तालुकाध्यक्ष कुमारपाल चोरडिया यांना सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र प्रदान करून कौतुक करण्यात आले.
इगतपुरी तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन आणि मेट्रो ब्लड बँकेवतीने घोटी येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ९ पासून दुपारपर्यंत विक्रमी १४५ रक्त पिशव्या संकलित झाल्या. आपण समाजासाठी काहीतरी देणे लागतो, समाजासाठी काहीतरी केले पाहिजे. रक्त नाही म्हणून रुग्णांना प्राण गमवावा लागणे, ही अतिशय चिंताजनक बाब आहे. प्रत्येकाने सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी थोडावेळ काढून रक्तदान केले पाहिजे. आपले रक्त कोणाचातरी प्राण वाचवणारे असते त्यामुळे रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे, अशी प्रतिक्रिया तालुकाध्यक्ष कुमारपाल चोरडिया यांनी व्यक्त केली. प्रदेशाध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त अडचणीच्या काळात रक्तदान करुन प्रशासनाला आणि आरोग्य विभागाला सहकार्य करणाऱ्या रक्तदात्यांचे असोसिएशनने आभार मानले. मातोश्री हॉस्पिटलचे संचालक डॉ. जितेंद्र चोरडिया, डॉ. महेंद्र शिरसाठ, डॉ. अमन नाईकवाडी, डॉ. गोपाळ चव्हाण, डॉ. जयंत कोरडे, डॉ. हेमलता चोरडिया, इगतपुरी तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे पदाधिकारी मेहुल शहा, दिनेश कोटकर, विकास सिंघल, उमेश हेमके, राजू उदावंत, धनंजय चव्हाण, रोहित थोरात, मतीन शेख, महेंद्र इंदानिया, युवराज रुमणे, नामदेव शेलार, ज्ञानेश्वर भागवत, कृष्णा भगत, दत्ता तांगडे, मतीन शेख, समकीत मेहता, रामा गव्हाणे, गौतम बेडमुथा, घोटी ग्रामस्थ, सर्व हॉस्पिटल आदींनी ह्या रक्तदान शिबिरासाठी परिश्रम घेतले.
