इगतपुरीनामा न्यूज – शिक्षण विकास मंच, यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई यांच्यावतीने राज्य अभ्यासक्रम आराखडा -२०२४’ या विषयावर शनिवार, दिनांक ७ डिसेंबर २०२४ रोजी शिक्षण कट्टा आयोजित केला होता. या कट्ट्याची सुरूवात योगेश कुदळे यांनी केलेल्या स्वागताने झाली. स्वागत करतेवेळी या कट्ट्याच्या आयोजनामागचा भूमिका त्यांनी उपस्थितांसमोर मांडली. शिक्षण विकास मंचाचे मुख्य समन्वयक डाॅ. माधव सूर्यवंशी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यात त्यांनी शिक्षण विकास मंच करत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. आगामी पंधरावी राज्यस्तरीय शिक्षण परिषद रविवार ५ जाने २०२५ ला होणार असल्याची आणि या परिषदेचा विषय ‘राज्य अभ्यासक्रम आराखडा-२०२४’ हा असल्याचे सांगितले. सोबतच हा कट्टा म्हणजे या परिषदेची पूर्वतयारीचा भाग असल्याचे नमूद केले.राज्य अभ्यासक्रम आराखडयावर चर्चा घडवून आणण्यासाठी आपण असे कट्टे राज्यभर घेण्याचे आणि यातून आलेल्या शिफारसी शासनाकडे पाठवणार असल्याची माहिती दिली.
या शिक्षण कट्ट्यास शिक्षण अभ्यासक, समुपदेशक आणि लेखक अरविंद शिंगाडे यांनी ‘राज्य अभ्यासक्रम आराखडा -२०२४’ ची महत्त्वाची वैशिष्ट्ये मार्गदर्शक अरविंद शिंगाडे यांनी त्यांच्या सादरीकरणात दिली. त्यांच्या विवेचनात त्यांनी राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण यावर प्रामुख्याने भर दिला. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील शालेय स्तर रचना, शालेय विषय, वेळेचं नियोजन आदी बाबी समजावून सांगितल्या.
स्तरनिहाय मूल्यमापन प्रक्रिया कशी असणार आहे, याबाबत त्यांनी विस्ताराने विवेचन केले. शिक्षकांचे सक्षमीकरण आणि सबलीकरण याचाही विचार या आराखड्यात केला आहे. समग्र प्रगतिपत्रक ही संकल्पना समजावून दिली. तसेच त्याची महत्त्वाची वैशिष्ट्ये समजावून दिली. राज्य अभ्यासक्रम आराखडा काय आहे, त्याचे स्वरूप नेमकं काय आहे? आदी मुद्दयांवर त्यांनी विस्ताराने मांडणी केली.
या कट्ट्यासाठी मुंबई, ठाणे, सातारा, सांगली, तसेच राज्याच्या विविध भागातून शिक्षक, मुख्याध्यापक, पालक, अभ्यासक आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कट्ट्यावर ‘राज्य अभ्यासक्रम आराखडा -२०२४’ च्या अनुषंगाने चर्चा झाली. आराखड्याची अंमलबावणी, दहावीच्या बोर्ड परीक्षांचे संभाव्य स्वरूप, अल्पशा तासिकांमध्ये शिक्षकांनी प्रस्तावित उद्दिष्ट्ये कशी साध्य करायची, सीबीएसईच्या धरतीवर येऊ घातलेल्या पाठ्यपुस्तकांचे स्वरूप व मूल्यमापन पद्धती, शिक्षकांना दिवसेंदिवस वाढत्या अडचणींचा सामना करावा लागत असताना अध्ययन अध्यापन प्रक्रियेस कसा न्याय द्यावा याबाबत उपस्थितांनी तळमळीने प्रश्न उपस्थित केले. त्या सर्व मुद्द्यांचा संकलित अहवाल शालेय शिक्षण विभागातील संबंधितांना सादर करण्यात येईल असे सांगून शिक्षण विकास मंचाच्या विशेष सल्लागार बसंती राँय यांनी चर्चेचा समारोप केला. कट्ट्याचे निवेदन तुषार म्हात्रे यांनी केले तर आभारप्रदर्शन अजित तिजोरे यांनी केले.