
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघाची समृद्धी साधून गावोगावी उन्नत विकास करण्यासाठी जनवादी पक्षाचे उमेदवार अनिल गभाले हा अत्यंत सक्षम पर्याय आहे. अनिल गभाले यांच्या माध्यमातून क्रियाशील आणि कृतिशील असणारे आमदार महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवावे असे आवाहन बिरसा ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष सतीश दादा पेंदाम यांनी केले. इगतपुरी तालुक्यातील खंबाळे येथील जाहीर सभेत सतीश दादा पेंदाम बोलत होते. यावेळी मार्गदर्शन करतांना त्यांनी सांगितले की, अनिल गभाले हा सर्वसामान्य गरीब कुटुंबातील उमेदवार असून त्यांना जनसामान्यांचे प्रश्न सोडविण्याचे ज्ञान आहे. त्यांचे नेतृत्व, वक्तृत्व आणि कर्तृत्व सर्वोत्तम असल्याने त्यांच्या प्रचारसभेसाठी मी स्वतः उपस्थित झालो आहे. सध्याचे केंद्र सरकार व राज्य सरकार आदिवासी विरोधी भूमिका घेताना दिसत आहे. या सरकारच्या धोरणामुळे आश्रमशाळांमधून शिकून उच्च शिक्षणासाठी शहरात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना डीबीटीचा अडसर तयार झाला. त्यामुळे आदिवासी समाजात शिक्षणाचा दर घसरला आहे. तो आम्ही सुधारणार असून त्यासाठी आमची ताकद पणाला लावू. कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांना समजेल असे डिजिटलायजेशन करणार असुन अद्ययावत सुविधांची निर्मिती करणार आहोत. बेरोजगार युवकांना व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रम राबवून रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करणार आहे. त्याचबरोबर इगतपुरी व त्र्यंबकेश्वर तालुक्यातील विविध विकास कामांवर भर देऊन मतदारसंघात विकासाचा आलेख उंचावण्यास प्राधान्य देऊ असेही त्यांनी सांगितले. कार्यकर्त्यांनी प्रत्येक गावागावात आणि घराघरात जाऊन प्रचार करा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. दुपारी घाटनदेवी मंदिरापासून उमेदवार अनिल गभाले यांची भव्य प्रचाररॅली काढण्यात आली होती. प्रचाररळीचा समारोप खंबाळे येथील जाहीर सभेत झाला. कार्यक्रमावेळी इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघातील शेकडो नागरिक उपस्थित होते.