भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघातील निवडणूक शिगेला पोहोचली आहे. निवडणुकीत रोज रंग भरत आला असून निवडणूकमय वातावरण तयार झाले आहे. महाविकास आघाडी इंदिरा काँग्रेसचे उमेदवार लकीभाऊ जाधव, महायुती राष्ट्रवादी काँग्रेसचे हिरामण खोसकर, मनसेचे काशिनाथ मेंगाळ, अपक्ष निर्मला गावित या चार प्रमुख उमेदवारांसह वंचितचे भाऊराव डगळे, स्वराज्यचे शरद तळपाडे, जनसंवादी पार्टी अनिल गभाले, अपक्ष जयप्रकाश झोले, भगवान मधे, बसपा धनाजी अशोक टोपले, शेकापचे अशोक गुंबाडे, भारत आदिवासी पार्टी कांतीलाल जाधव, स्वाभिमानीच्या चंचल बेंडकुळे, अपक्ष कैलास भांगरे, बेबी ( ताई ) तेलम, विकास शेंगाळ, शंकर जाधव प्रचारात मग्न आहेत. चार प्रमुख उमेदवारांचा प्रचारदौरा, बैठका, गाठीभेटीसाठी कायम कार्यकर्ते आणि वाहनांचा ताफा सोबत असावा लागतो. मतदारांना भुलवण्यासाठी वाहनांची गर्दी असावी असा उमेदवारांचा आग्रह असतो. एका वाहनाला एकावेळच्या दौऱ्यासाठी ५ हजार ते ८ हजार दिले जातात. यामुळे वाहनधारक एकाचवेळी थोड्या थोड्या वेळेचे अंतर ठेवून सर्व पक्षाच्या कार्यक्रमाला हजेरी लावतात. सेल्फी काढून संबंधित उमेदवार किंवा त्यांचा खजिनदार हेरून पैसे काढण्याची लगबग केली जाते. घोटी, इगतपुरी, हरसूल, कसारा चालणारे धंदेवाईक वाहनावाले पैसे वाटपाच्या ठिकाणी आपलं आपलं नेटवर्क वापरून पैसे घेण्यापुरते हजर होतात. एका दिवशी किमान २ तरी उमेदवार गाठवून त्यांच्याकडून मलिदा काढून घेतला जातो. अशा प्रकारामुळे वाहनधारकांची चांगलीच चांदी झाली आहे. उमेदवारांचे पैसे वाटप करणारे सुद्धा ह्या “फाळक्या”त कमिशन घेऊन सामील आहेत. यामुळे सर्वच उमेदवार प्रचंड मनस्तापात आणि वैतागले आहेत. गाड्यांमध्ये बसणारे कार्यकर्ते ओल्या पार्टीसाठी अधिकचे पैसे मागत असल्याने नको रे ती निवडणूक असे स्वर येऊ लागले आहेत. पैसे न मिळाल्यास किंवा कमी मिळाल्यास उमेदवाराला विरोधी काम करण्याचा थेट धडक इशारा दिला जात असल्याने हे बोके पोसण्याशिवाय हातात काही नाही असे एका उमेदवाराने सांगितले. विशेष म्हणजे असे पैसे वाटप थेट महामार्गावर होत असतांना निवडणूक यंत्रणा सुद्धा मांजरीसारखे डोळे मिटून असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी दिली.
error: Content is protected !!
WhatsApp us
Join WhatsApp Group