वाल्मीक गवांदे, इगतपुरीनामा न्यूज, दि. २५
नाशिक जिल्हयातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीतील विकास करणे योजने अंतर्गत मंजूर असलेली कामे निकृष्ट दर्जाची होत असल्याच्या ग्रामस्थांच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे शासनाचा निधी वाया जात असून जनतेचे देखील समाधान होत नाही. सदरची कामे चांगले दर्जेदार व्हावे यासाठी जिल्हा परिषद सभापती सुशीला मेंगाळ यांनी जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांना पत्र दिले. संबंधित अधिकाऱ्यांनी स्थानिक स्तरावरून संबंधित तालुक्यातील गटविकास अधिकारी, सहाय्यक गटविकास अधिकारी, उपअभियंता, शाखा अभियंता व ग्रामसेवक यांनी प्रत्येक गावातील दलित वस्तीतील मंजूर असलेली व अपूर्ण असलेली कामे लक्ष देऊन चांगल्या दर्जाचे करून घ्यावे असे पत्र दिले आहे. विशेष म्हणजे काम चालू असताना प्रत्येक अधिकाऱ्याने घटनास्थळी जाऊन उभे राहून कामाची चौकशी करावी तसेच काम निकृष्ट दर्जाचे होत असल्यास अशा कामांची बिले काढू नये अशी सूचना सभापती सुशीला मेंगाळ यांनी दिले आहेत.