इगतपुरीनामा न्यूज – वर्षानुवर्षे गरिबीचे दाहक चटके सोसत सोसत उपेक्षित आदिवासी समाज, सर्वसामान्य माणसाला न्याय देण्यासाठी कायम मी लढत आलो आहे. सामान्य माणसाच्या वेदना, त्यांच्यावर होत असलेला अन्याय, रोजच्या जगण्यासाठी आटापिटा, चिंताजनक बेरोजगारी पाहून माझे डोळ्यातील अश्रू आता सुकून गेले आहेत. ह्याच सामान्य पिचलेल्या माणसाला मी गेली दहा पंधरा वर्ष आधार देऊन त्यांच्या हक्कासाठी रोज लढतोय. मात्र राजकारणातून अरबपती झालेले लोकं हा सामान्य आणि आदिवासी माणसाचा लढा त्यांच्या महागड्या बुटाखाली चिरडू पाहताय. त्यामुळेच माझ्यासारख्या गरीबाच्या लेकराच्या विरोधात अख्खे धनाढ्य आणि तीन तीन माजी आमदार दंड थोपटून उभे ठाकले आहेत. पण असे कितीही लक्ष्मीपुत्र आणि कितीही माजी आमदार माझ्यापुढं येऊ द्या… मी कोणाला घाबरत नाही.. कारण इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघातला प्रत्येक सामान्य आणि आदिवासी माणूस परमेश्वरासारखा माझ्या पाठीशी आहे. अरे प्रस्थापितांनो, कितीही अडचणी अन संकटे उभे करा… हा गरीबाचा लकीभाऊ जाधव त्या संकटांच्या ढिगाऱ्यावर उभा राहून सामान्य मतदारांच्या ताकदीने इगतपुरीचा आमदार म्हणून निवडून आल्याशिवाय राहणार नाही. इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघातील मविआच्या इंदिरा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार ), शिवसेना उबाठा आणि मित्रपक्षांचे अधिकृत उमेदवार लकीभाऊ जाधव यांनी आक्रमक शैलीत हा संवाद साधला. आज गुरुवारी पहाटे प्रचारदौरा सुरु करण्यापूर्वी इगतपुरीनामाचे संपादक भास्कर सोनवणे यांच्याशी विविध विषयांवरील चर्चेप्रसंगी ते बोलत होते.
लकीभाऊ जाधव पुढे म्हणाले की, महाविकास आघाडीच्या इंदिरा काँग्रेसने आतापर्यंत इगतपुरीतुन अनेक आमदार घडवले. पण अनेकांनी इथल्या मतदारांना भुलथापा देऊन आपली पोळी भाजून घेतली. ठराविक लोकांना जवळ धरून स्वतःचा आणि त्यांचा सोडून काहीही विकास केला नाही. धरणे असून शेतकऱ्यांना पाणी नाही, रस्ते गायब आहेत. स्थानिक तरुण हताशपणे बेरोजगारीच्या झळा सोसतोय. मायबहिणींच्या डोक्यावरचा हंडा उतरला नाही. आरोग्य व्यवस्थाच आजारी पडली आहे. ह्या मतदारसंघातला सर्वसामान्य माणूस, प्रत्येक आदिवासी समाज, युवावर्ग वर्षानुवर्षे गरिबीने गांजला आहे. असे असून ह्या माजी आमदारांना फक्त त्यांच्या काही ठराविक लोकांची काळजी आहे हे आपण पाहतोय. ही भयानक परिस्थिती बदलण्यासाठी महाविकास आघाडी, इंदिरा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मित्रपक्ष यांच्यातर्फे मी उमेदवारी करतोय. काँग्रेस नेते राहुल गांधी, राष्ट्रवादी नेते शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ नेते आ. बाळासाहेब थोरात आणि माझ्या मतदारसंघातील मायबाप मतदार यांच्या आशीर्वादाने मी हा लढा निश्चितच जिंकणार आहे. हा लढा गरिबाचे लेकरू विरुद्ध ३ माजी आमदार असा आहे. पण कितीही माजी आमदार माझ्या विरोधात उतरू द्या.. जनतेचा आशीर्वाद माझ्यासोबत असल्याने माझा विजय निश्चित आहे.