
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी शहरातील राममंदिर भागात ७१ वर्षीय जेष्ठ नागरिकाला पोलीस असल्याची बतावणी करून फसवणूक करण्यात आली आहे. आज सकाळी ही घटना घडली असून इगतपुरी शहरात यामुळे चर्चेला उधाण आले आहे. इगतपुरी पोलीस ठाण्यात संबंधित २ भामट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि अन्य स्रोत वापरून कसून तपास सुरु केला आहे. इगतपुरी येथील श्याम मुलचंद पुरोहित वय ७१ यांना इगतपुरी राममंदिर परिसरात एक भामट्याने मी पोलिसात असून माझे नाव शिंदे आहे असे सांगितले. पुढे गावात चेकिंग चालू आहे. तुम्ही तुमच्या हातातील अंगठी व पैसे असतील तर काढून सुरक्षित ठेवा असे सांगितले. यावेळी आलेल्या दुसऱ्या भामट्याने ते साहेब आहेत. आपल्याला फसविणार नाही असे सांगत विश्वास संपादन केला. पहिल्या भामट्याने अंगठी व पैसे सुरक्षित ठेवल्याचे भासवून रुमालात बांधल्याचे नाटक केले. हा ऐवज घेऊन हे दोन्ही भामटे पसार झाले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच श्याम पुरोहित यांनी इगतपुरी पोलीस ठाण्यात जाऊन २ भामट्यांच्या विरोधात फिर्याद दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे. जेष्ठ नागरिकांमध्ये फसवणूकीच्या प्रकारामुळे चिंता वाढत आहे.