
इगतपुरीनामा न्यूज – मला राजकारणाचे बाळकडू माझे वडील माजी आमदार शिवराम झोले यांच्याकडून मिळाले. त्यांचे विचार डोळ्यासमोर ठेऊन स्थानिक भूमिपुत्र म्हणुन मला जनतेची सेवा करायची असून त्यांचे प्रश्न सोडवायचे आहेत. काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीत मला जनतेचा प्रचंड पाठिंबा मिळत असून जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने ही निवडणूक अपक्ष म्हणून लढवत आहे. यंदाच्या निवडणुकीत आमची मोठी ताकद दाखवून देणार असल्याचे युवा नेते तथा अपक्ष उमेदवार बाळासाहेब उर्फ जयप्रकाश शिवराम झोले यांनी सांगितले. आदिवासी बहुजनांचा बुलंद आवाज असलेले माजी आमदार शिवराम झोले यांचे सुपुत्र युवा नेते बाळासाहेब उर्फ जयप्रकाश शिवराम झोले यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने नाकारले. मात्र जिद्द न सोडता त्यांनी स्थानिक भूमिपुत्र म्हणून अपक्ष उमेदवारी दाखल केलेली आहे. आज माघारीच्या दिवशी त्यांना निवडणूक निशाणी चिन्ह रिक्षा भेटल्याचे समजताच कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. कोणत्याही भूलथापांना बळी न पडता रिक्षा चिन्हाच्या समोरील बटन दाबून मला प्रचंड मताने विजयी करा असे आवाहन त्यांनी केले आहे.