
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरीच्या दोन टर्म आमदारकी भोगणाऱ्या माजी आमदार निर्मला गावित उद्या दुपारी १२ वाजता इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघात आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. उबाठा शिवसेनेच्या त्या उपनेत्या असून आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करतील. यानंतर सर्वांच्या एकमताने उमेदवारी कायम करण्याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे. उद्या इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपली शक्ती दाखवून द्यावी असे आवाहन माजी आमदार निर्मला गावित यांनी केले आहे. नाशिक येथील इगतपुरी त्र्यंबकेश्वर उपविभागीय अधिकारी कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दुपारी १२ वाजेची वेळ निश्चित केली आहे. यावेळी अनेक उमेदवार सुद्धा आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील.