शिरसाठे ग्रामपंचायतीला संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता पुरस्काराचे वितरण : विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम आदींच्या हस्ते मिळाला पुरस्कार

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील शिरसाठे ग्रामपंचायतीला संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात जिल्हास्तरीय तिसरा क्रमांक मिळाला आहे. नाशिकचे विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम, मुख्य कार्यकारी अधिकारी असीमा मित्तल, खासदार भास्कर भगरे यांच्या हस्ते लोकनियुक्त सरपंच सुनिता दत्ता सदगीर, उपसरपंच साहेबू वामन गांगुर्डे, ग्रामसेवक हनुमान दराडे, ग्रामपंचायत सदस्य वर्षा केशव बोडके, अनिता सुरेश चंदगिर, मंजुळा पप्पू शिद, साहेबराव पोपट गांगुर्डे, कोमल चंद्रकांत गांगुर्डे, दशरथ पंढरीनाथ ढोन्नर यांनी शिरसाठे ग्रामपंचायतीचा पुरस्कार स्वीकारला. यावेळी ग्रामस्थ डॉ. दत्ता बाळासाहेब सदगीर, केशव राजाराम बोडके, सुरेश धोंडीराम चंदगिर, चंद्रकांत गांगुर्डे, कर्मचारी संपत सप्रे, भावराव गांगुर्डे, काळू चंदगिर आदींनी जल्लोष केला. स्वच्छतेमुळे अनेक गावांचा कायापालट होऊन गावे आदर्श झाली आहेत. स्वच्छता अभियानामुळे देशातील लाखो बालकांचे प्राण वाचले असल्याचा अहवाल आहे. त्यामुळे सर्व गावांनी परदेशातील गावांप्रमाणे स्वच्छ, सुंदर व आदर्श गाव होण्यासाठी लोकसहभागातून एकत्र येण्याचे आवाहन यावेळी विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांनी केले. नाशिक जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाच्या वतीने संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतींचा जिल्हास्तरीय पुरस्कार सोहळा आज संपन्न झाला. यावेळी प्रवीण गेडाम हे मार्गदर्शन करत होते. खासदार भास्कर भगरे यांनी स्वच्छता अभियानामुळे गावांचा कायापालट होत असून आपण स्वत: सरपंच असताना या अभियानात काम केले असल्याचा अनुभव मांडला. स्वच्छता अभियानातून गावाला विकासाची दिशा प्राप्त होत असल्याचेही त्यांनी नमूद केले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी दैनंदिन जीवनात स्वच्छतेचे अतिशय महत्व असून स्वच्छता अभियान ही लोकचळवळ स्वरुपात गावात राबविण्याचे आवाहन केले.

Similar Posts

error: Content is protected !!