गोरख बोडके यांच्याकडून कोरोना काळात मदत कार्य ; 20 ऑक्सिजन सिलेंडरची ग्रामीण रुग्णालयात मदत

इगतपुरीनामा न्यूज, दि. 30

दुष्काळात तेरावा महिना ह्या म्हणीप्रमाणे कोरोना महामारी सगळ्यांचाच कस काढीत आहे. कधी ऑक्सिजन, कधी बेड तर कधी इंजेक्शन अशा अनेकानेक अडचणी असल्यामुळे आरोग्य यंत्रणेवर मोठा भार निर्माण झाला आहे. मात्र असे असूनही महामारी सोबत दोन हात करण्यासाठी शिरसाठे गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके सातत्याने आघाडीवर आहेत. त्यांनी आज इगतपुरी ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांसाठी 20 ऑक्सीजन सिलिंडर दिले आहेत. ऐन संकट काळात मोठे मोठे नेते मदतीच्या मैदानातून गायब होत असतांना गोरख बोडके यांनी केलेली विविध मदत लोकांच्या कौतुकाचा विषय ठरली आहे.
इगतपुरी तालुक्यात कोरोनाचा वाढता संसर्ग आणि रोज वाढणारी रुग्णसंख्या लक्षात घेऊन गोरख बोडके यांनी विविध प्रकारची मदत केली आहे. यामध्ये ऑक्सिजन कॉन्स्टेट्रेटर मशीन, ऑक्सिजन सिलेंडर, भरलेला ऑक्सिजन, बेड, इंजेक्शन, औषधे यांचा समावेश आहे. इगतपुरी तालुक्यात गेल्या वर्षीही त्यांनी अन्नधान्याची मोठी मदत दिली होती. अशा संकटकाळात दिलासा देण्यासाठी ज्यांच्याकडून अपेक्षा होती ते लोक मदतीपासून पळपुटेपणा करणारे ठरले आहेत. इगतपुरी ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षिका डॉ. स्वरूपा देवरे यांनी ग्रामीण रुग्णालयाला 20 ऑक्सीजन सिलेंडर दिल्याबद्दल धन्यवाद व्यक्त केले.