राज्यातील खासगी व इंग्रजी शाळांनी विद्यार्थ्यांची फी कमी करा ; जिजाऊ ब्रिगेड प्रदेशाध्यक्षा माधुरी भदाणे यांची शिक्षणमंत्र्यांकडे मागणी

इगतपुरीनामा न्यूज, दि. 30 : गेल्या वर्षभरापासून कोरोनामुळे सर्वसामान्य माणसाचे कंबरडे मोडले आहे. खाजगी कंपनीतील नोकरदार, व्यावसायिक यांना आपल्या कुटुंबाचे पालनपोषण लॉकडाऊन काळात घरात बसून करावे लागत आहे. अवकाळीमुळे शेतकऱ्यांचा खरिपाचा हंगाम तर गारपिटीमुळे रब्बी हंगाम वाया गेला आहे. आर्थिक चणचणीमुळे सर्व बेजार झाले आहेत. अशा परिस्थितीत आपल्या कुटुंबातील पाल्यांचा शिक्षणाचा खर्च कसा करावा असा प्रश्न प्रत्येक कुटुंबापुढे आहे. त्यामुळे खाजगी शाळा व इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी लॉकडाऊन काळात विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी कमी करून पालकांना दिलासा द्यावा अशी मागणी जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षा माधुरी भदाणे यांनी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे केली आहे.
निवेदनात असे म्हटले आहे की, सर्वसामान्य माणसाचे कोरोनामुळे आर्थिक हात बांधले गेले आहेत. कुटूंब कसे सांभाळावे असा प्रश्न आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या फी अव्वाच्या सव्वा झाल्या आहेत. अशातच संस्थाचालकांचा फी साठी तगादा असतो. यामुळे पालक अक्षरश वैतागले आहेत. दुसऱ्या शाळेत ऐनवेळी प्रवेश मिळणार नाही याची भिती असल्याने “धड पाल्यांना शाळेतून काढता येईना, फी भरता येईना” अशा चक्रव्यूहात पालक सापडले आहेत. एकतर इंग्रजी माध्यमाच्या शाळा ऑनलाईन सुरु असल्याने संस्थांना इतर खर्चाचा भार कमी लागत आहे. याउलट पालकांना घरातील आपल्या एक दोन मुलांना ऑनलाईन शिक्षणासाठी महागडे मोबाईल घेऊन द्यावे लागत आहेत. वरून दर महिन्याचा मोबाईल रिचार्जचा खर्च वेगळा असा आर्थिक भार पालकांना पडत आहे. त्यामुळे कोरोना संकटकाळात विद्यार्थ्यांकडून कमीत कमी फी घेण्यात यावी अशी मागणी प्रदेशाध्यक्षा भदाणे यांनी केली आहे. गेल्या वर्षी दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षाच रद्द झाली असल्याने विद्यार्थ्यांची परीक्षा फी शासनाने परत द्यावी अशी मागणी भदाणे यांनी केली आहे.

महाराष्ट्रभर एकूण 16 लाख 10 हजार दहावीच्या विद्यार्थ्यांचे ९६ कोटी ६० लाख रुपये फी जमा झालेली आहे. सरसकट सर्व विद्यार्थ्यांची फी माफ करावी. कोरोना संकट काळात इंग्रजी माध्यमांकडून शाळेकडून अव्वाच्या सव्वा फी वसूल करण्यात येऊ नये. यावर जिल्हाधिकारी यांनी महाराष्ट्रात जिल्हावार पथक नेमत अंकुश ठेवावा. संस्थाचालकांनी सामाजिक भान ठेवत कमीत कमी फी पालकांकडून घ्यावी. फी वसूल करण्यासाठी दांडगाई करणाऱ्या उर्मट संस्थाचालकांविरुद्ध जिजाऊ ब्रिगेडतर्फे जनआंदोलन छेडले जाईल. ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांना संस्थेकडून फी साठी तगादा लावला जात असेल अशा पालकांनी जिजाऊ ब्रिगेड पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. – माधुरी भदाणे, प्रदेशाध्यक्षा, जिजाऊ ब्रिगेड

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!