इगतपुरीनामा न्यूज – वडनेर खाकुर्डी पोलीस ठाणे हद्दीत रावळगाव येथील पेट्रोलपंपावरील रोख रक्कम भरणा करणाऱ्याला अडवुन कोयत्याचा धाक दाखवत ५ लाख ३४ हजार ७०० रुपयांच्या जबरी चोरीचा मागील वर्षी गुन्हा दाखल आहे. यावर्षी ६ लाख ५९ हजार ४३० रुपयांची जबरी चोरी केल्याचा गुन्हा दाखल आहे. यासह तीन ते चार महिन्यापुर्वी भायगांव शिवारात महिला बचत गटाचे पैसे बँकेत भरायला जाणाऱ्याला अज्ञात तीन ते चार आरोपीतांनी मोटर सायकलवर पाठलाग करुन त्यांना रस्त्यात अडवले. कोयत्याचा धाक दाखवुन त्यांच्या ताब्यातुन ६४ हजार ८१८ रुपये असलेली बॅग बळजबरीने चोरी केल्याचा गुन्हा दाखल आहे. कुकाणे परिसरातील अन्य गुन्ह्यात ५५ हजार ६०० रुपये असलेली बॅग जबरी चोरी, वडगांव शिवारात ७१ हजार ५०० ची घरफोडीबाबत गुन्हा दाखल आहे. यासह स्थानिक शेतकऱ्यांच्या शेतीतील पाण्याच्या मोटारी चोरीच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अपर पोलीस अधीक्षक, मालेगांव अनिकेत भारती, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांनी ह्या घटनांच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा, नाशिक ग्रामीण यांना गुन्हे उघडकीस आणण्यासाठी सुचना दिल्या होत्या. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजु सुर्वे, पोलीस उपनिरीक्षक दत्ता कांभिरे, पोलीस अंमलदार पो. हवा. गिरीष निकुंभ, सुभाष चोपडा, शरद मोगल, नरेंद्रकुमार कोळी, योगेश कोळी, तांत्रिक विश्लेषण शाखेचे हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम तसेच वडनेर खाकुर्डीचे सहा. पोलीस निरीक्षक शिशीरकुमार देशमुख, उपनिरीक्षक, श्री नवले, पो. अंम. गजानन कासार यांच्या पथकाने ४ जबरी चोऱ्या, १ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणले आहे. शेतकऱ्यांच्या ४ मोटर चोरी प्रकरणात १० आरोपी अग्नीशस्त्र, धारदार हत्यार व ६ मोबाईल फोन आणि गुन्ह्यात वापरलेल्या ३ मोटर सायकली हस्तगत केल्या आहेत.
पोलीस निरीक्षक राजु सुर्वे, पोउनि दत्ता कांभिरे व पथक यांनी केलेल्या समांतर तपासात गुन्ह्यातील आरोपींची गुन्हा करण्याची पध्दत, गुन्ह्यातील साक्षीदारांनी आरोपीचे सांगितलेले वर्णन व त्यांची बोलीभाषा यावरुन गोपनीय माहिती काढण्यात आली. हे गुन्हे सराईत गुन्हेगार महेंद्र मधुकर सोनवणे रा, काष्टी ता. मालेगांव व विशाल सुभाष पवार रा. सेक्शन बी मालेगांव याने त्याचे वेगवेगळ्या साथीदारांसह मिळुन केलेले असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली. त्यावरुन त्यांना सुरुवातीस अग्नीशस्त्रासह ताब्यात घेवुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने काष्टी, कुकाणे ता. मालेगांव व मालेगांव कॅम्प, पंचशिलनगर, जाजुवाडी या परिसरातुन १) महेंद्र मधुकर सोनवणे, वय २२ वर्षे, रा. काष्टी ता. मालेगांव, (कुकाणे व भायगांव शिवार बॅग लिप्टींग व घरफोडी) २) दिनेश उर्फ डेविल नंदु पवार, वय २० वर्षे, रा. मालेगांव कॅम्प, सिंधी कलनी, (रावळगांव पेट्रोलपंप, भायगांव शिवार बॅग लिप्टींग व घरफोडी), ३) विशाल सुभाष पवार, वय २० वर्षे, रा. पाचडिव्हीजन, सेक्शन बी, ता. मालेगांव (रावळगांव पेट्रोलपंप, कुकाणे व भायगांव शिवार बॅग लिप्टींग), ४) तुषार उर्फ काळ्या आप्पा मोहिते, वय १९ रा. पंचशीलनगर, मालेगांव कॅम्प, (कुकाणे बॅग लिप्टींग), ५) अक्षय मधुकर खरे, वय २३, रा. पंचशिलनगर, मालेगांव कॅम्प, (कुकाणे बॅग लिप्टींग), ६) अरुण दत्तु सोनवणे, वय २४ रा. कुकाणे ता. मालेगांव (कुकाणे बॅग लिप्टींग), ७) दिपक धर्मराज गुजरे, वय २१, रा. जाजुवाडी हनुमान मंदिराजवळ, मालेगांव (रावळगांव पेट्रोलपंप), ८) अनिकेत कनैय्या गवळी, वय २२ रा. मालेगांव कॅम्प, श्रीकृष्णनगर, (रावळगांव पेट्रोलपंप), ९) जितु आखाडे पवार, वय १९, रा. कुकाणे ता. मालेगांव (कुकाणे बॅग लिप्टींग) १०) राहुल संजय खैरनार, वय २३ रा. काष्टी ता. मालेगांव (कुकाणे बॅग लिप्टींग) ह्या आरोपींना ताब्यात घेतले आहे.
त्यांच्याकडून ह्या गुन्ह्यांच्या तपासात चौकशी केली असता महेंद्र मधुकर सोनवणे रा. काष्टी याने त्याचे साथीदारांसह महिला बचत गटाचे पैसे जमा करणारे व्यक्तीचा मोटर सायकलवर कुकाणे, भायगांव परिसरातुन पाठलाग केला. त्यांना कोयत्याचा धाक दाखवुन त्यांच्याकडुन बळजबरीने बॅगमधील रोख रक्कम हिसकावुन घेवुन पळुन गेले असल्याची कबुली दिली आहे. दिपक धर्मराज गुजरे, अनिकेत गवळी, विशाल पवार, दिनेश पवार यांनी रावळगांव परिसरातुन पेट्रोलपंपाचे पैसे भरणा करणारे इसमाचा पाठलाग करुन त्यास कोयत्याचा धाक दाखवुन रोख रक्कम बळजबरीने हिसकावुन घेतली असल्याची कबुली दिली आहे. शेतकऱ्यांच्या पाण्याच्या मोटारी चोरी प्रकरणी अरुण सोनवणे याने कबुली दिली आहे. आरोपी विशाल पवारच्या कब्जातुन त्याने विनापरवाना जवळ बाळगलेला एक गावठी पिस्टल, दोन जिवंत काडतुसे (राऊंड) व एक धारदार तलवार व कोयता हस्तगत करण्यात आला आहे. त्याचेविरुध्द भा.ह.का. अन्वये स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. दिनेश पवार, जितु पवारकडुन त्याने गुन्ह्यात वापरलेला धारदार कोयता व खंजीर हस्तगत करण्यात आला. हे गुन्हा करण्यासाठी आरोपीताने वापरलेल्या ३ मोटर सायकली व ६ मोबाईल फोन जप्त करण्यात आलेले आहेत. आरोपी विशाल पवार विरुध्द यापुर्वी २ मारामारीचे, महेंद्र सोनवणे विरुध्द २ जबरी चोरी व एक विनयभंग व पोक्सो, दिनेश उर्फ डेविल पवार विरुध्द जबरी चोरीचा १ व राहुल खैरनार विरुध्द २ मारामारीचे गुन्हे दाखल आहेत. ह्या आरोपीतांना पुढील तपासकामी वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.