
इगतपुरीनामा न्यूज – ७८ व्या भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने रोटरी क्लब हिलसिटीचे अध्यक्ष गोरख बोडके यांच्या प्रयत्नातून मोडाळे येथील आठवी ते दहावीच्या सर्व शालेय विद्यार्थ्यांना दर्जेदार ड्रेसचे वाटप करण्यात आले. ज्ञानदा माध्यमिक विद्यालयात वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या सायली दीपक पालखेडकर उपस्थित होत्या. रोटरी क्लब हिलसिटीच्या कार्याचे त्यांनी भरभरून कौतुक केले. ह्या भागातील बहुतांशी कुटुंबाची आर्थिक परिस्थिती कमकुवत आहे. या सर्व कुटुंबातील विद्यार्थ्यांना आधार मिळावा या हेतूने गोरख बोडके यांनी कपडे वाटप करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. ह्या मदतीमुळे शैक्षणिक प्रगतीत चांगली वृद्धी होणार आहे. मोडाळे येथील लोकनियुक्त सरपंच शैला आहेर, मुख्याध्यापक जगदीश मोरे, सामाजिक कार्यकर्ते निवृत्ती कातोरे यांनी रोटरी क्लब हिलसिटीचे अध्यक्ष गोरख बोडके यांच्या उपक्रमाचे कौतुक करून ऋण व्यक्त केले. शिक्षणाने समृद्धी मिळत असली तरी हे शिक्षण घेण्यासाठी सर्वांगीण परिस्थिती अनुकूल असावी लागते. ही अनुकूलता प्रत्यक्षात येण्यासाठी होतकरू विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तके, दप्तर, इतर शैक्षणिक साहित्य, सायकली आदी उपक्रम राबवले जातात. यामध्ये भर टाकून दर्जेदार कपडे वाटप करण्यासाठी मोडाळे येथील सर्व विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली असे प्रतिपादन गोरख बोडके यांनी यावेळी केले.