इगतपुरीनामा न्यूज – स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर एल्गार कष्टकरी संघटनेचे कार्यकर्ते उद्या गुरुवारी सकाळी ११ वाजता त्र्यंबकेश्वर तालुक्यातील जोशी कंपनी या ठिकाणी रस्त्यात असलेल्या खड्ड्यांमध्ये ध्वजवंदन आंदोलन करणार आहेत. खड्ड्यांमध्ये लाकडी खांब उभे करुन तिथेच तिरंग्याला वंदन करण्यात येणार आहे. यावेळी राष्ट्रगीत आणि महाराष्ट्र गीत गाऊन देशाभिमान व्यक्त करण्याचे ठरवण्यात आले आहे. याच खड्ड्यांमध्ये पारंपरिक आदिवासी नृत्य करून राष्ट्रीय जागर होईल. यानंतर हातात तिरंगे झेंडे घेऊन जोशी कंपनी ते नाशिक अशी पायी पदयात्रा नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात मागण्यांचे निवेदन देण्यासाठी जाणार आहे अशी माहिती एल्गार कष्टकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भगवान मधे यांनी दिली.
स्वातंत्र्य मिळून ७७ वर्ष उलटून गेली मात्र इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ग्रामीण रस्ते मात्र आजही ब्रिटिशकाळापेक्षा वाईट अवस्थेत आहेत. त्र्यंबक तालुक्यात मागील आठवड्यात रस्ता ओलांडताना एकाचा मृत्यू झाला, इगतपुरी तालुक्यातील वैतरणा नदीवर अत्यंत मोडकळीस आलेल्या पुलावरून प्रवास करावा लागतो. वैतरणा ते देवगाव रस्त्यात मोठे मोठे खड्डे पडले असून तेथून पायी चालणे सुद्धा कठीण आहे. दापुरे ते जोशी कंपनी या रस्त्याची पूर्ण चाळण झाली आहे. सापगाव ते कळमुस्ते ह्या रस्त्याचे काम निकृष्ट असून अपूर्णावस्थेत आहे. ह्या सर्व रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती करावी. ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे टाके हर्ष येथील संपत शंकर घोटे या व्यक्तीचा पाण्यात वाहून गेल्याने मृत्यू झाला आहे. संबंधित ठेकेदारावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल व्हावा यासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. आंदोलनाद्वारे शासनाचा निषेध करत लक्ष वेधण्यात येणार असल्याचे श्री. मधे यांनी कळवले आहे.