इगतपुरीनामा न्यूज – हवामान बदलास अति संवेदनशील गावांचे प्रातिनिधीक असणाऱ्या चिंचलेखैरे येथे आदिवासी शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेण्यासाठी सुसंवाद कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प संचालक परिमल सिंह (भा. प्र. से.), मृद विज्ञान विशेषज्ञ प्रकल्प व्यवस्थापन कक्ष मुंबईचे विजय कोळेकर, नाशिकचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, आत्माचे प्रकल्प संचालक राजेंद्र निकम, उपविभागीय कृषी अधिकारी अभिजित घुमरे साहेब उपस्थित होते. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प नाशिक जिल्ह्यातील सर्व तालुक्यात राबविण्याच्या दृष्टीने संचालक महोदयांनी केलेल्या दौऱ्यासह कार्यक्रमाला महत्त्व प्राप्त झाले आहे. सरपंच मंगा खडके, उपसरपंच भाऊ भुरबुडे, ग्रामपंचायत सदस्य वनिता भुरबुडे आणि ग्रामस्थांनी उपस्थित अधिकाऱ्यांचे चिंचलेखैरे गावातर्फे स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक इगतपुरीचे तालुका कृषी अधिकारी रामदास मडके यांनी केले.
कार्यक्रमात इगतपुरी परिसरातील शेतकऱ्यांनी त्यांच्या विविध अडचणी मांडून संभावित कृषीविषयक अपेक्षा व्यक्त केल्या. उपस्थित प्रकल्प संचालक व अधिकारी यांनी सर्व अडचणी समजून घेऊन त्यावर उपाय योजना सुचवल्या. इगतपुरी तालुक्याच्या सर्वांगीण कृषी विकासाला पुरक योजना तयार करून अंमलबजावणी करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळ कृषी अधिकारी मनोज रोंगटे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी पर्यवेक्षक महेश वामन, दादासाहेब जोशी, सर्व कृषी सहाय्यक आदींनी प्रयत्न केले. कृषी पर्यवेक्षक संजय चव्हाण यांनी सूत्रसंचालन तर मंडळ कृषी अधिकारी मनोज रोंगटे यांनी आभार मानले. दुपारच्या सत्रात विभागीय कृषी संशोधन केंद्र इगतपुरी येथील सभागृहात संचालक महोदयांनी नाशिक जिल्ह्यातील १५ तालुक्यांचे तालुका कृषी अधिकारी, ४ उपविभागीय कृषी अधिकारी, विद्यापीठातील शास्त्रज्ञ यांच्या सोबत संवाद साधला. अधिकाऱ्यांनी सादरीकरणाद्वारे जिल्ह्यातील शेती क्षेत्रातील दशा आणि भविष्यातील दिशा याविषयी सविस्तर माहिती संचालक यांना दिली.