इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील भाम धरणामुळे पुनर्वसित झालेल्या दरेवाडी येथील ग्रामस्थांनी कोणत्याही प्रकारच्या नागरी सुविधा मिळत नसल्याच्या निषेधार्थ भाम धरणात जलसमाधी घेणार असल्याचा इशारा दिला आहे. आदिवासी दिन आणि क्रांती दिनाच्या दिवशी ९ ऑगस्टला हे आंदोलन करणार असल्याचे एल्गार कष्टकरी संघटनेच्या वतीने उपजिल्हाध्यक्ष गणपत गावंडा, भीमा गुबांडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना कळवले आहे. ह्या पार्श्वभूमीवर आंदोलकांच्या सोबत चर्चा करून मार्ग काढण्यासाठी इगतपुरीचे तहसीलदार अभिजित बारवकर यांनी उद्या दि. ७ ऑगस्टला दुपारी बैठक आयोजित केली आहे. मात्र तालुकास्तरीय आणि ग्रामस्तरीय अधिकारी उपस्थित असणाऱ्या ह्या बैठकीचे निमंत्रण एल्गार कष्टकरी संघटनेने धुडकावून लावले आहे. बैठकीत बोलावण्यात आलेल्या एकही अधिकाऱ्याला नागरी सुविधा आणि प्रकल्पग्रस्त नागरिकांचे प्रश्न सोडवण्याचा आणि निर्णय घेण्याचा अधिकार नाही. परिणामी जलसमाधी आंदोलन करणाऱ्या ग्रामस्थांना भुलथापा देण्यासाठी ही बैठक असल्याने आम्ही बैठकीला जाणार नसल्याचे संस्थापक अध्यक्ष भगवान मधे यांनी सांगितले. आंदोलकांचे प्रश्न आणि समस्या सोडवणूकीसाठी जिल्हाधिकारी सक्षम आणि निर्णयक्षम असल्याने त्यांच्यासोबत बैठक घेतल्यास उपस्थित राहू असेही ते म्हणाले आहेत.
तहसीलदारांनी बोलावलेल्या बैठकीला सहाय्यक अभियंता श्रेणी १ मुकणे धरण उपविभाग, उपअधिक्षक, भुमि अभिलेख, इगतपुरी, गटविकास अधिकारी इगतपुरी, मंडळ अधिकारी घोटी, तलाठी दरेवाडी, ग्रामसेवक दरेवाडी यांना उपस्थित राहण्यास सांगण्यात पत्राद्वारे सांगण्यात आले आहे. यापैकी कोणालाही प्रश्नाधीन प्रकरणी काहीही निर्णय घेण्याचा अधिकार नाही. यासह दरेवाडी हे गाव महसूली नसून येथे स्वतंत्र तलाठी नाही, ग्रामपंचायत नसल्याने स्वतंत्र ग्रामसेवक सुद्धा नाही. तरीही त्यांना बैठकीला बोलावण्यात आल्याचे पत्रात दिसते. म्हणजे इगतपुरी तहसीलदार कार्यालयाला याबाबत अनभिज्ञता असेल तर इतरांचे काय असा प्रश्न भगवान मधे यांनी केला आहे. भाम धरणामुळे विस्थापित झालेल्या दरेवाडीचे पुनर्वसन नवीन जागेत गेल्या पाच वर्षांपूर्वी करण्यात आले. मात्र या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या नागरी सुविधा देण्यात आल्या नाही. पाच वर्षापासून सतत पुनर्वसन विभाग व पाटबंधारे विभाग यांच्याकडे पाठपुरावा सुरु आहे. ठिकाणी मातीचा भराव करून कालव्याला बांधकाम करावे. भिंत टाकावी. त्या ठिकाणी शाळा इमारत, सामाजिक सभागृह, अंगणवाडी इमारत व्हावी आदी मागण्या आहेत. जागतिक आदिवासी दिन व ऑगस्ट क्रांती दिनाच्या दिवशी दरेवाडी येथील सर्व ग्रामस्थ जलसमाधी घेऊन जीवन संपवणार असल्याचा इशारा देण्यात आलेला आहे.