वाडीवऱ्हे प्राथमिक आरोग्य केंद्रातील रिक्त पदांमुळे सगळी आरोग्य यंत्रणा सलाईनवर

संतापलेल्या नागरिकांची रिक्त पदे भरण्याची मागणी

इगतपुरीनामा न्यूज, दि. ३०

इगतपुरी तालुक्यातील सर्वाधिक लोकसंख्या आणि आरोग्यावर ताण असलेले प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणून  वाडीवऱ्हे ओळखले जाते. कोरोना काळापासून तर ह्या आरोग्य केंद्राला अतिरिक्त कामे करावी लागत आहे. अशा परिस्थितीत दुष्काळात तेरावा महिना काय असतो ह्याचे मोठे उदाहरण म्हणजे वाडीवऱ्हे आरोग्य केंद्र आहे. आरोग्य केंद्रासह अनेक उपकेंद्रांत विविध रिक्त पदे असल्याने त्याचा दुष्परिणाम कामकाजावर होत आहे. यामुळे परिसरातील नागरिकांत मोठ्या प्रमाणावर असंतोष पसरला आहे. कोविड लसीकरण कार्यक्रमाला सुद्धा अपुऱ्या मनुष्यबळाचा फटका बसत आहे. तातडीने वाडीवऱ्हे आरोग्य केंद्रातील रिक्त पदे भरावीत अशी मागणी ह्या भागातील नागरिकांकडून होत आहे. ह्याप्रकरणी लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून वाडीवऱ्हे आरोग्य केंद्रातील दुखणे दूर करावे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

इगतपुरी तालुक्यातील वाडीवऱ्हे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात परिसरातील महत्वपूर्ण गावे आहेत. औद्योगिक क्षेत्रातील कामगारांच्या वाढत्या संख्येने ह्या आरोग्य केंद्रावर नेहमीच आरोग्य सुविधा देण्याचा ताण वाढत असतो. कार्यक्षेत्रातील गावांमध्येही आरोग्य सुविधा देण्यासाठी ह्या आरोग्य केंद्रांची यंत्रणा कमी पडते. अशा भयानक परिस्थितीत ह्या आरोग्य केंद्रात असलेल्या रिक्त पदांमुळे कामकाज करण्यासाठी दुखणे वाढत आहेत. लोकांना आरोग्य सुविधा देण्याची मानसिकता आणि तयारी असतांना सुद्धा अपुऱ्या मनुष्यबळामुळे लोकांच्या असंतोषाला सामोरं जावे लागत आहे. ह्यामुळे वाडीवऱ्हे प्राथमिक आरोग्य केंद्राला विविध दुखण्यांनी ग्रासले असल्याचे दिसून येते.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे बाह्यरुग्ण विभाग परिचारिकेचे पद गेल्या ८ वर्षांपासून रिकामे आहे. मोडाळे येथील आरोग्य उपकेंद्रांत असलेली ANM आणि MPW ही दोन्ही पदे रिक्त आहेत. सांजेगाव आणि पाडळी देशमुख उपकेंद्रांत ANM चे पद रिकामे आहे. आरोग्य केंद्रात आरोग्य पर्यवेक्षकाचे १ पद रिक्त असल्याने त्याचा दुष्परिणाम कामकाजावर झाला आहे. आरोग्य केंद्रात इतर आवश्यक कामांसाठी असणारे शिपायांची २ पदे सुद्धा अनेक वर्षांपासून रिकामीच आहेत. या कारणामुळे आरोग्य यंत्रणेच्या उपलब्ध कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर अतिरिक्त कामांचा ताणतणाव वाढला आहे. हक्काच्या रजा घेतांना सुद्धा रजा मिळतील की नाही ? अशा प्रश्नांनी कर्मचारी हतबल झालेले दिसतात.

कोरोना काळातील आरोग्य सेवेचे कामकाज मोठ्या प्रमाणावर वाढले असून कोरोना प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रमामुळे सुद्धा अपुरे मनुष्यबळ लोकांच्या संतापाला कारणीभूत ठरत आहे. कोरोनाच्या भयानक काळात येथील उपलब्ध कर्मचाऱ्यांमधून ५ जण कोरोना बाधित झाल्याने तर हे आरोग्य केंद्र अधिकच चर्चेत आलेले होते. अशा एकंदरीत परिस्थितीमुळे आरोग्य सेवा सध्या सलाईनवर आहे असे दिसून येते. नागरिकांना याबाबात काही माहिती नसल्याने त्यांचा रोष अतिरिक्त जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या कर्मचाऱ्यांना सोसावा लागतो. या प्रकरणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, इगतपुरीच्या गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड आणि लोकप्रतिनिधींनी लक्ष घालावे अशी मागणी ह्या भागातील नागरिकांनी केली आहे.

 वाडीवऱ्हे आरोग्य केंद्रातील रिक्त पदांबाबत जिल्हा परिषदेकडे यापूर्वी कळवण्यात आलेले असून पाठपुरावा सुरू आहे. लवकरच ही पदे भरण्यात येतील अशी अपेक्षा आहे.

- डॉ. एम. बी. देशमुख, तालुका आरोग्य अधिकारी इगतपुरी
आमच्या कार्यक्षेत्रातील गावांमध्ये आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. तथापि अपुऱ्या बळामुळे आमच्यावर अतिरिक्त ताण येतो. लवकरच संपूर्ण रिक्त पदे भरली जातील अशी आशा वाटते. म्हणजेच आम्हाला अधिकाधिक चांगली आरोग्य सुविधा देता येणे शक्य होईल.

- डॉ. विजय माळी, वैद्यकीय अधिकारी वाडीवऱ्हे

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!