संभाजी ब्रिगेड वर्धापन दिन नाशिक – अभ्यासू वक्ते गंगाधर बनबरे यांची तोफ गरजणार : शिवसेना नेते भास्कर जाधव राहणार उपस्थित

संभाजी ब्रिगेडमध्ये मोठ्या संख्येने होणार प्रवेश सोहळा

दीपक भदाणे : इगतपुरीनामा न्यूज, दि. 30
मुलुख मैदानी तोफ म्हटले जाणारे शिवसेना नेते भास्कर जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत आज पुरोगामी विचारांची ज्वलंत संघटना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या वर्धापन दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई नाका परिसरातील भाभानगर येथील ३ हजार क्षमता असलेल्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड सांस्कृतिक सभागृहात दुपारी ३ वाजता या सोहळ्याची सुरुवात होणार आहे. या वर्धापनदिन सोहळ्यात शिवसेना नेत्यांसह संभाजी ब्रिगेडचे पट्टीचे ओळखले जाणाऱ्या वक्त्यांच्या भाषणाने हा सोहळा गाजणार आहे. यावेळी मोठ्या संख्येने संभाजी ब्रिगेडमध्ये होणाऱ्या पक्ष प्रवेशामुळे हे अधिवेशन गाजणार आहे. संभाजी ब्रिगेड पक्षाची घोषणा झाल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये उर्जितावस्था निर्माण करण्यासाठी दरवर्षी वर्धापनदिन साजरा केला जातो. वेगवेगळ्या वक्त्यांच्या माध्यमातून विचारांची शिदोरी कार्यकर्त्यांना दिली जाते. त्यामुळे ही शिदोरी घेऊन कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या उर्जेने वेगवेगळ्या जिल्ह्यात काम करतात. हा मान यावर्षी नाशिकला मिळाला असल्याने संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष व कार्यक्रमाचे आयोजक डॉ. स्वप्नील इंगळे यांनी केले आहे. अधिवेशनाची सुरुवात राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा पूजनाने होणार आहे. यावेळी शिव-विचारांचे प्रचार प्रसार करणारे राज्यातील उदयोन्मुख प्रसिद्ध शिवशाहीर शिवराज शिंदे (नांदेड ) यांच्या शाहिरी जलसाने कार्यक्रमात सुरुवातीला रंगत येणार आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संभाजी ब्रिगेडचे महानगरप्रमुख प्रफुल्ल वाघ करतील. त्यानंतर संभाजी ब्रिगेडचे प्रदेश महासचिव सौरभ खेडेकर यांचे मार्गदर्शनपर मनोगत होणार आहे. त्यानंतर सर्व राज्याला परिचित असणारे संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते गंगाधर बनबरे हे संभाजी ब्रिगेडची भूमिका मांडणार आहेत. त्यानंतर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व विरोधकांचा समाचार घेणार घेण्यात पटाईत असणारे आमदार भास्कर जाधव यांचे मनोगत होईल. त्यानंतर संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष ॲड. मनोज आखरे अध्यक्षीय मनोगत करणार आहेत. यावेळी प्रदेश पातळीवरील नेते डॉ. शिवानंद भानुसे, राज्य कोषाध्यक्ष गजानन पारधी, संतोष गाजरे, राज्य उपाध्यक्ष प्रदीपकुमार तुपेरे, सुहास राणे, चंद्रकांत वैद्य, अभिमन्यू पवार, संघटक चंद्रकांत वैद्य, संतोष शिंदे, उमाकांत उफाडे, डॉ. बालाजी जाधव, प्रेमकुमार बोके उपस्थित राहणार आहेत. राज्यभरातून काही नवीन होतकरू तरुण-तरुणी संभाजी ब्रिगेडमध्ये मोठ्या संख्येने प्रवेश करणार आहेत. आगामी महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनेने शिवसेनेकडे एकूण जागांपैकी २० टक्के जागांची मागणी केली आहे. त्या पार्श्वभूमीवर आगामी ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, महानगरपालिका निवडणुकांवर महत्वपूर्ण चर्चा होणार आहे. राज्यातील औद्योगिक प्रकल्प बाहेर राज्यात जात असल्यामुळे महाराष्ट्रातील युवकांवर आलेले बेरोजगारीचे सावट, राज्यभरात घडणाऱ्या अप्रिय घटना, अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे अद्याप भरपाई न मिळाल्यामुळे
शेतकऱ्यांची झालेली फरफट यासह सत्ताधारी पक्षाच्या लोकप्रतिनिधींकडून महिलासंदर्भात होणारे बेताल वक्तव्य, बहुजन महापुरुषांची होणाऱ्या बदनामीमुळे विरोधकांचा समाचार घेतला जाणार आहे. फसलेला स्मार्ट सिटी प्रकल्प यावरही लक्षवेधी होणार आहे. वर्धापन दिन सोहळ्यात काही महत्त्वाचे ठराव पारित करण्यात येणार आहेत. कार्यक्रमाचे आभार संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष डॉ. स्वप्निल इंगळे मानतील.

संभाजी ब्रिगेड गेली अनेक वर्ष पुरोगामी चळवळीत काम करून राज्यातल्या अनेक प्रश्नांवर प्रखर आंदोलन करत न्याय मिळवून दिला आहे. पुरोगामी विचारांची ज्वलंत संघटना म्हणून संभाजी ब्रिगेडचे नाव मोठ्या आदराने घेतले जाते. ज्या-ज्या वेळेस महापुरुषांचा चुकीचा इतिहास किंवा महापुरुषांची बदनामी केली जाते त्या त्या वेळेस संभाजी ब्रिगेडने वेळोवेळी आंदोलन करत महापुरुषांची बदनामी थांबवली आहे. जेम्स लेन, भांडारकर प्रकरण, वाघ्या कुत्रा तोडफोड प्रकरण, १९ फेब्रुवारी शिवजयंती साजरी करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल यासारखी अनेक आंदोलन करत समाजासमोर ज्वलंत संघटना म्हणून ओळख निर्माण केली आहे. यामुळे अतिशय अभ्यासू व प्रामाणिक, आक्रमक युवकांची टीम संभाजी ब्रिगेडकडे आहे. संभाजी ब्रिगेडकडे अभ्यास असणाऱ्या वक्त्यांची फौज आहे. शेतमालाला हमी भाव, दारूमुक्त गाव १००%  राजकारण व १०० % समाजकारण हे ब्रीद घेत शिवसेना फुटल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेना पक्षाच्या पाठीशी संभाजी ब्रिगेड मोठ्या ताकतीने पुढे आली. राज्यभरात होणाऱ्या विविध प्रश्नांवर एकत्र काम करण्यासाठी शिवसेनेच्या मदतीला संभाजी ब्रिगेड सरसावली. त्यामुळे पडत्या काळात संभाजी ब्रिगेड पाठीशी उभी राहिल्यामुळे उद्धव ठाकरे यांनी आक्रमक असणाऱ्या संभाजी ब्रिगेड पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले होते. त्याच पार्श्वभूमीवर नाशिक मधील संभाजी ब्रिगेडचा वर्धापनदिन सोहळा उद्धव ठाकरे यांचा शिवसेना पक्ष व संभाजी ब्रिगेड पक्ष एकत्र येत साजरा करत असल्याने संभाजी ब्रिगेडचा वर्धापन दिन सोहळा मोठ्या जल्लोषात व ताकतीने साजरा होणार आहे. नाशिकचे संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष डॉ. स्वप्नील इंगळे यांच्यासह जिल्हाभरातील सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते कार्यक्रम यशस्वीतेसाठी गेल्या महिनाभरापासून जिल्हाध्यक्ष डॉ. स्वप्निल इंगळे,नाशिकचे निरीक्षक डॉ. संदीप कडलग, महानगर प्रमुख प्रफुल्ल वाघ, जिल्हा सचिव नितीन रोटे पाटील, उपजिल्हाप्रमुख विशाल अहिरराव, सरचिटणीस विकी गायधनी, लोकसभा अध्यक्ष शरद लबडे, मंदार धिवरे, सागर पाटील, अक्षय आठवले, हरेश्वर पाटील, राकेश जगताप, संकेत चराटे, चेतन पगारे, प्रथमेश पाटील यांच्यासह युवक व महिला पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.

आकर्षणाचे केंद्रबिंदू शिवव्याख्याते गंगाधर बनबरे
आपल्या सडेतोड अभ्यासपूर्ण वकृत्वाने परिचित असणारे संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते शिवश्री गंगाधर बनबरे हे राज्यस्तरीय वर्धापन दिन सोहळ्याचे मुख्य आकर्षण असणार आहेत. मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष युगपुरुष पुरुषोत्तम खेडेकर यांचे अत्यंत विश्वासू शिलेदार म्हणून ओळखले जाणारे गंगाधर बनबरे हे सत्ताधारी पक्षाची वाभाडे काढण्यात संपूर्ण राज्याला परिचित आहेत. त्यांच्या विविध ऐतिहासिक, सामाजिक, राजकिय अभ्यासामुळे ज्याठिकाणी त्यांची भाषण असतात त्या ठिकाणी त्यांचे व्याख्यान ऐकण्यासाठी त्यांचे चाहते मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. ज्या वेळेस बहुजन महापुरुषांची बदनामी होते त्यावेळेस त्यांच्या अभ्यासपूर्ण शैलीने इतिहासाचे अभ्यासपूर्ण दाखले देत ते विरोधकांना नामोहरण करतात. नाशिकला होणाऱ्या संभाजी ब्रिगेड राज्यस्तरीय वर्धापनदिन सोहळ्यात ते विरोधकांचा काय समाचार घेतात ? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Similar Posts

error: Content is protected !!