इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा – कृषी पर्यवेक्षक किशोर भरते : विविध गावांमध्ये डॉ. पंजाबराव देशमुख कृषी पंधरवडा सुरु

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालक्यातील शेतकऱ्यांनी निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून न राहता आपल्या पिकाचा विमा उतरवून घ्यावा. शासनाने मागील वर्षापासून शेतकऱ्यांना १ रुपयात पीक विमा लागू केला आहे. त्याचा शेतकऱ्यांनी लाभ घेऊन जास्तीत जास्त पीक विमा काढावा असे प्रतिपादन कृषी पर्यवेक्षक किशोर भरते यांनी केले. इंदोरे येथे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी संजीवनी पंधरवडा निमित्त शेतकरी प्रशिक्षणात ते बोलत होते. कृषी विभागाच्या विविध महत्वपूर्ण योजना तसेच कृषी तंत्रज्ञानाचा प्रचार प्रसार करण्यासाठी इगतपुरी तालुक्यात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. ह्या पंधरवड्याची सांगता महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जन्मदिनाला १ जुलै कृषीदिन साजरा करून होणार असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमावेळी सरपंच जनार्दन शेणे, नथू पिचड, देवराम खतेले, कुमार खतेले, लहानु मोरे, काळू साबळे, तळपे मॅडम, ग्रामसेवक संदीप वसावे आदी उपस्थित होते.

कृषी सहाय्यक विजय कापसे यांनी पीक स्पर्धा, जैविक आणि रासायनिक खतांचा समतोल वापर, भात लागवडीची चारसुत्री पद्धत, सगुणा राइस टेक्नॉलॉजी, कृषी यांत्रिकीकरण याविषयी मार्गदर्शन केले. इंदोरे, खेड भैरव, बारशिंगवे, मांजरगाव, खदकेद, पिंपळगाव मोर, खैरगाव, साकुर, भरवीर बुद्रुक, पिंपळगाव घाडगा, बांबळेवाडी, फांगुळगव्हाण, आडवण, सांजेगाव, धार्णोली, समनेरे, गरुडेश्वर, नांदूरवैद्य, कुशेगाव, तळोघ, नांदगाव बुद्रुक, शेणवड खुर्द आदी गावामध्ये कृषी विभागामार्फत कार्यक्रम घेऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले आहे. सध्या सुरू झालेल्या कृषी पंधरवाड्यात बीजप्रक्रिया जनजागृती दिन, पीएम किसान उत्सव दिवस, जमीन सुपीकता जागृती दिन, गुणवत्तापूर्ण निविष्ठांची ओळख दिन, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड व तंत्रज्ञान प्रसार, पीक विमा योजना जनजागृती दिन, हवामान अनुकूल शेती तंत्रज्ञान प्रसार दिन, सोयाबीन व मका लागवड तंत्रज्ञान दिन, कापूस, भात, ऊस लागवड तंत्रज्ञान दिन, तूर व इतर कडधान्य लागवड तंत्रज्ञान दिन, कृषी महिला शेतकरी सन्मान दिन, कीड व नियंत्रणाच्या उपाययोजना, शेतकरी मासिक वाचन दिन व वर्गणीदार वाढवणे, प्रगतशील शेतकरी संवाद दिन असे कार्यक्रम १ जुलै कृषी दिनानिमित्त आयोजित केले असल्याची माहिती इगतपुरीच्या कृषी विभागाने दिली.

Similar Posts

error: Content is protected !!