मुदत संपलेल्या २९ आणि मुदत संपणाऱ्या ३६ अशा एकूण ६५ ग्रामपंचायतींच्या निवडणुका कधी होणार? : गाव पुढाऱ्यांमध्ये ग्रामपंचायत निवडणुकांची उत्सुकता शिगेला

भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – लोकसभा निवडणुकीपूर्वी इगतपुरी तालुक्यातील अनेक महत्वाच्या गावांमध्ये ग्रामपंचायत निवडणुकांचा रणसंग्राम पार पडणार होता. मात्र लोकसभेच्या धुरळ्यामुळे ह्या निवडणुका रखडल्या गेल्या. लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर तरी ग्रामपंचायत निवडणुका घोषित होण्याची अपेक्षा ग्रामीण भागात व्यक्त करण्यात येत होती. तथापि तालुक्यातील निवडणूक यंत्रणेकडून अद्याप याबाबत कोणतीही हालचाल दिसून येत नसल्याने ग्रामपंचायत निवडणुका नेमक्या कधी होणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. आधीच अनेक वर्षांपासून जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपरिषद निवडणुक झाली नसल्याने प्रशासक राजवट लावण्यात आलेली आहे. ह्या महिन्यापर्यंत २९ ग्रामपंचायतींची मुदत संपलेली असून ३६ ग्रामपंचायतींची मुदत ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात संपत आहे. म्हणजेच जवळपास ६५ मोठ्या आणि छोट्या ग्रामपंचायतींची मुदत ऑगस्ट पर्यंत संपणार असल्याने त्यांच्यावरही प्रशासकीय राजवट लागू होणार आहे. सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य होण्यासाठी गाव पुढाऱ्यांनी पूर्वतयारी केली असल्याने ग्रामीण भागात डावपेच आखले जात आहे. प्रभाग रचना, आरक्षण, मतदार यादी आदी बाबत काहीही हालचाल नसल्याने ह्या निवडणुका घेण्यासाठी विधानसभा निवडणुकीनंतरच मुहूर्त लाभेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. पावसाळ्यात ही निवडणुक घेणे सर्वांसाठी त्रासदायक असून ऑक्टोबरला विधानसभा निवडणुका घेतल्या जातील. त्यानंतर नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यात इगतपुरी तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक घेतली जाईल असा अंदाज व्यक्त होतोय.

५ मे ह्या दिवशी रायांबे, शेवगेडांग, धार्णोली, मुरंबी, बेलगांव कुऱ्हे, उभाडे, मालुंजे, कांचनगांव, खैरगांव, खडकेद, बारशिंगवे, पिंपळगांव मोर, वाकी, पिंपळगांव भटाटा, मायदरा धानोशी, इंदोरे, धामणी, अधरवड, कावनई, आहुर्ली, म्हसुर्ली, कोरपगांव, पाडळी देशमुख, नांदुरवैद्य, देवळे, समनेरे, सोनोशी ह्या ग्रामपंचायतींची मुदत संपली असून मांजरगांव ग्रामपंचायतची मुदत १५ जूनला संपली आहे. ह्या सर्व ठिकाणी प्रशासक राजवट लागू झाली आहे. शेनवड बुद्रुक ग्रामपंचायतची मुदत २४ जूनला संपेल तर खंबाळे, साकुर, आंबेवाडी, त्रिंगलवाडी, वाळविहीर, सांजेगांव, वाडीवऱ्हे, कुऱ्हेगांव, नांदगांव बुद्रुक, जानोरी, पिंपळगांव घाडगा, घोटी बुद्रुक, पिंप्री सद्रोद्दीन, भावली खुर्द, तळोशी, चिंचलेखैरे, अडसरे बुद्रुक, बेलगांव तऱ्हाळे यांची मुदत
४ ऑगस्टला संपणार आहे. माणिकखांब, काळुस्ते, खेड भैरव यांची ५ ऑगस्टला तर गोंदे दुमाला, मुकणे, पिंपळगांव डुकरा, घोटी खुर्द, भरविर खुर्द, शेणीत, वाघेरे, बोर्ली, मानवेढे, कुरुंगवाडी, आवळखेड, टाकेद बुद्रुक, धामणगांव, निनावी, टाकेद खुर्द यांची मुदत ६ ऑगस्टला संपेल. भर पावसाळ्यात ह्या सर्व ठिकाणी मुदत संपण्याच्या आधी निवडणुक घेणे शक्य नाही. त्यामुळे सर्व ६५ ग्रामपंचायती आणि तत्पूर्वी संभाव्य रिक्त होणाऱ्या ठिकाणी पोटनिवडणुका घेण्यासाठी नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्याचा मुहूर्त साधला जाण्याचा अंदाज आहे.

Similar Posts

error: Content is protected !!