काय सांगता…? इगतपुरी तालुक्यातील मोडाळे गावात साकारला अंधारात लख्ख प्रकाशणारा चमकदार रस्ता : महाराष्ट्र राज्यातील पहिल्याच चकाकणाऱ्या रस्त्याला पाहण्यासाठी वाढतेय गर्दी

इगतपुरीनामा न्यूज, दि. २३

फक्त परदेशात आणि लहानपणी परीकथेमध्ये अनेकांनी चकाकणारा रस्ता ऐकलेला असेल. ह्या प्रकाशमान रस्त्याबाबत अनेकांना कायमच कुतूहल असते. अशा प्रकारचा चमचमीत रस्ता पोलंड ह्या देशामध्ये असल्याचे ऐकिवात आहे. मात्र इगतपुरी तालुक्यातील अतिदुर्गम मोडाळे गावात अंधार पडल्यावर चक्क प्रकाशमान आणि उजळून टाकणारा रस्ता तयार करण्यात आला आहे. ह्या रस्त्यावरून चालणाऱ्यांसह वाहनधारकांना जणू काही लख्ख प्रकाशमय रस्त्यावर परदेशात आहे की काय…! असे वाटायला लागले आहे. चमकदार रस्त्याची संकल्पना संपूर्ण महाराष्ट्रात प्रथमच मोडाळे गावात जिल्हा नियोजन समिती सदस्य तथा माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके, इंजि. संचिन जनक लंगडे आणि ठेकेदार विश्वास जनक लंगडे यांनी प्रत्यक्षात आणली आहे. एचएएल ओझरचा सामाजिक उत्तरदायित्व निधी आणि नाशिक जिल्हा परिषद यांच्या सहयोगाने निर्माण केलेला चमकणारा रस्ता पाहण्यासाठी मोठी गर्दी उसळत आहे.

इगतपुरी तालुक्यातील मोडाळे ह्या गावात अनेक हटके आणि जगावेगळे विकासकामे नेहमीच होत असतात. हे गाव आपल्या वेगळ्या वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. जिल्हा नियोजन समिती सदस्य तथा माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके, इंजि. सचिन जनक लंगडे आणि ठेकेदार विश्वास जनक लंगडे यांनी राबवलेली प्रकाशमान रस्त्याची संकल्पना चांगलीच यशस्वी झाली आहे. ओझर येथील एचएएल यांचा सामाजिक उत्तरदायित्व निधी आणि नाशिक जिल्हा परिषद यांच्या सहयोगाने ह्या रस्त्याचे काम झाले आहे. काँक्रीटीकरण आणि भूमिगत गटारींचे काम यासोबत पूर्ण करण्यात आले आहे. रात्र झाल्यावर उजळून निघणारा लख्ख प्रकाशमान रस्ता पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. मोडाळे गावात जणू काही दिवाळीचा दीपोत्सव आजपासून सुरू झाल्याने ग्रामस्थांनी सुद्धा जल्लोष केला. संपूर्ण महाराष्ट्रात अशा प्रकारचा रस्ता प्रथमच साकारला आहे. सिंथेटिक फॉस्फरस अथवा पार्टीकल्स प्रकारचे साहित्य रस्ता चमकायला वापरण्यात आले आहे. यामध्ये विविधरंगी उजेडाने अखंडित प्रकाश डोळ्यांना स्वर्गीय अनुभव देत आहे. हा रस्ता पाहण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!