सुनिल बोडके : इगतपुरीनामा न्यूज, दि. २७
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील शेवटचे टोक असलेल्या ठाणापाडापासून जवळ असणाऱ्या कास परिसरात खैराच्या झाडाची मोठ्या प्रमाणात कत्तल करण्यात येत आहे. हे सगळे प्रकार गंभीर असूनही वन विभाग मात्र झोपेचे सोंग घेऊन गप्प आहे. दुर्मिळ होत चाललेल्या खैर झाडाची बेसुमार कत्तल होत असूनही वन विभागाची “अर्थपूर्ण” गाढ झोप सुरू आहे. यामुळे झाडांची कत्तल करणारे करवतीचा वापर करून खैराच्या झाडाच्या मुळावर उठले असल्याचा आरोप किसान सभेचे जिल्हा सेक्रेटरी इरफान शेख यांनी केला आहे.
शासन जंगल वाचवण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत असताना झाडांचे तस्कर मात्र अधिकारी वर्गाला हाताशी धरून १०० वर्षाच्या झाडावर कुऱ्हाड चालवत आहेत. यामुळे स्थानिक आदिवासी बांधवांचे नाव खराब करण्याचा डाव असल्याचे दिसते. खैर हा झाडाचा प्रकार फक्त याच परिसरात आढळतो. काही जणांच्या या कृत्याने खैर झाड या भागातून लोप पावत चालला आहे. हे कुठे तरी थांबायला हवे अन्यथा खैर या भागातून पूर्णपणे नामशेष होईल अशी भीती व्यक्त होत आहे. ह्या परिसरातील झाडाची कत्तल ही कोणाच्या आशीर्वादाने आहे ? या विषयावर तालुक्यात चर्चा रंगत आहे. या सर्व प्रकाराला वन विभागाची साथ आहे का ? असा सवाल नागरिकांनी केला आहे. खैराच्या झाडांची कत्तल होत असल्याची माहिती मिळताच पोलीस प्रशासन व वन विभाग घटनास्थळी पोहचले आहे. जो वर दोषींवर कारवाई होत नाही तो पर्यंत स्थानिक मात्र तोडलेले झाडे राखत ठिय्या मांडून बसले आहे.
या भागात मोठ्या प्रमाणात तस्करीचा प्रकार सुरू असून अधिकारी वर्गाच्या परवानगीनेचा हे प्रकार घडत आहे. मजूरीने लोक लावून मोठं-मोठे झाडे आडवे होत आहे, यात मात्र स्थानिक आदिवासीचे नाव बदनाम करून आपली पोळी भाजून घेण्याचा अधिकारी वर्गाचा डाव आहे. यात दोषींवर योग्य ती कारवाई झाली पाहिजे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.
- इरफान शेख, किसान सभा जिल्हा सेक्रेटरी