वाडीवऱ्हे गावात 3 दिवसांपासून विजेचा खेळखंडोबा ; विजेअभावी निम्म्या गावात काळोखाचे साम्राज्य

इगतपुरीनामा न्यूज, दि. 28 ( शरद मालुंजकर, वाडीवऱ्हे )
इगतपुरी तालुक्यातील मोठे गाव असणाऱ्या वाडीवऱ्हे गावात गेल्या 3 दिवसांपासून वीज गायब आहे. त्यामुळे ग्रामस्थांचे पिण्याच्या पाण्याचे हाल होत आहेत. भर उन्हाळ्यात वीज नसल्याने वाढत्या उकाड्याने ग्रामस्थ उबगले आहेत. ट्रान्सफार्मर जळाल्याने वीज गायब असूनही वीज मंडळाचे कर्मचारी डोळेझाक करीत आहेत. संतापलेलेले नागरिक वीज मंडळाला शिव्यांची लाखोली वाहत आहेत.
वाडीवऱ्हे बाजार पेठेचे मोठे गाव असूनही सलग तीन दिवस वीज नाही.  त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. एकीकडे विजबिलांची वसुली मोहीम सुरु आहे.तर दुसरीकडे मात्र नागरिकांना विजेअभावी विविध अडचणीना सामोरे जावे लागत आहे. व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान होतेय. 3 दिवसात 3 ट्रान्सफार्मर जळाले असल्याने पिण्याचे पाणीही मिळत नाही. उन्हाळ्यामुळे अतिशय उष्णता असल्याने उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे अजुन किती दिवस अंधारात काढावे लागणार असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
लॉकडाउनमुळे घरात असलेले लोक, बालके, वयोवृद्ध नागरिक उकाड्यामुळे बाहेर पडत आहेत. विजेअभावी पीठ गिरण्या बंद असून मोबाईलची चार्जिंग करायची सोय आणि पिण्याचे पाणी नसल्याने नागरिक हैराण आहेत. व्यावसायिकांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. वारंवार खंडित होणाऱ्या विजेमुळे नागरिक संतप्त झाले असून विज वितरण कार्यालयाने त्वरित विजेची समस्या सोडवावी अशी मागणी करण्यात आली आहे.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!