गोरख बोडकेंच्या सतर्कतेमुळे बेरोजगार युवकांची फसवणूक टळली

नवनाथ गायकर, इगतपुरीनामा न्यूज, दि. १७

इगतपुरी तालुक्यातील एका तथाकथित शिक्षण संस्थेने शासन मान्यताप्राप्त असल्याचा दावा करत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी नोकरभरतीचा घाट घातला होता. मात्र ही संस्था शासनातंर्गत मान्यताप्राप्त नसल्याची शंका आल्यामुळे सत्यता पडताळून पाहत माजी जिल्हा परिषद सदस्य तथा घोटी बाजार समितीचे उपसभापती गोरख बोडके यांनी या बोगस संस्थेचे पितळ उघडे पाडले आहे. ह्या संस्थेने आज आयोजित केलेल्या मुलाखती अकस्मात कोरोनाचे तांत्रिक कारण देत रद्द केल्या आहेत. दरम्यान या प्रकारामुळे मोठ्या प्रमाणात बेरोजगारांची फसवणूक टळल्याची जिल्हाभरात चर्चा सुरु झाली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी कि महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक व न्याय विभागाची मान्यता असल्याचा दावा करत चक्क शाहू, फुले, आंबेडकर आदी महापुरुषाच्या नावाचा गैरवापर केला. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावाने शासन मान्यताप्राप्त निवासी व अनिवासी आश्रमशाळा असल्याचा दावा करत सदर शैक्षणिक संस्थेने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी भरतीचा घाट घातला होता. सदर भरतीसाठी जिल्ह्यातील आघाडीच्या दैनिकातून मुलाखतीच्या जाहिराती प्रसिद्ध करण्यात आलेल्या होत्या. या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने बेरोजगार सुशिक्षित युवकांनी नोकरीच्या आशेने प्रयत्न सुरू केले होते.

मात्र या संस्थेच्या खरे-खोटे पणाची शहानिशा माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके यांनी शासनस्तरावर केली असता अशा पद्धतीची आश्रमशाळा मान्यताप्राप्त नसल्याची धक्कादायक माहिती उजेडात आल्याची माहिती बोडके यांनी दिली आहे. यानंतर बोडके यांनी सदर संस्थेच्या चालकास जाब विचारला असता संबंधितांचे पितळ उघडे पडले. अखेर संभाव्य फसवणूक उघडकीस आल्यानंतर सदर संस्थेने आज दि.१७ सप्टेंबर रोजी होणारी मुलाखत तांत्रिक कारण देत रद्द केली आहे. दरम्यान बोडके यांच्या सतर्कतेमुळे बेरोजगार व सुशिक्षित युवकाचीं होणारी संभाव्य फसवणूक टळली असली तरी महापुरुषांची नावे बिनदिक्कतपणे वापरत फसवणूकीचे उद्योग करणाऱ्या संबंधित महाभागावर कारवाई करावी अशी संतप्त मागणी युवकांनी केली आहे.

फसवणूक टाळावी - बोडके
सामाजिक न्याय विभागाची आश्रमशाळा अशी जाहिरात एका नामांकित दैनिकात प्रसिद्ध झाली होती. सबंधित शाळेची चौकशी फोन वर सामाजिक न्यायमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्याकडे केली असता त्यांनी अशा कोणत्याही शाळेला पद भरतीची परवानगी दिली नाही अशी माहिती सबंधित मंत्री महोदयांनी दिली आहे. धक्कादायक बाब म्हणजे सबंधित शाळा अस्तित्वातच नाही! मुंडे साहेबांनी याची दखल घेऊन सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी यांना शाळेची पाहणी करण्याकरिता पाठवले असता शाळा अस्तित्वात नाही याची खात्री झाली आहे. त्याचबरोबर नियोजित मुलाखती रद्द करण्याचे सबंधित अध्यक्षाने मान्य केले आहे तरी कोणत्याही भूलथापांना बेरोजगार युवकांनी बळी पडू नये.
- गोरख बोडके, माजी जिल्हा परिषद सदस्य

महापुरुषांची नावे बिनदिक्कतपणे वापरत आणि चक्क शासनाची मान्यता असल्याचा हवाला देत अशा प्रकारे फसवणूक करणाऱ्या महाभागावर कठोरात कठोर कारवाई करावी. संभाव्य फसवणूक टळली याबद्दल बोडके यांचे आभार!
मुलाखती साठी आलेला एक युवक

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!