
इगतपुरीनामा न्यूज, दि. ३० – इगतपुरी तालुक्यातील घोटी खुर्द ग्रामपंचायतीच्या सरपंच ताई माणिक बिन्नोर यांना मालेगावच्या अप्पर जिल्हाधिकारी माया पाटोळे यांनी अपात्र घोषित केल्याचा आदेश दिला आहे. याप्रकरणी शिवाजी एकनाथ फोकणे यांनी निवडणुक विवाद अर्ज दाखल केला होता. त्याबाबत वेळोवेळी सुनावणी कामकाज घेऊन पुरावे अवलोकन करण्यात आले. त्यानुसार सरपंच ताई बिन्नर यांचे पती आणि सासरे यांच्या नावावर धनादेशाने रक्कम काढल्याचे सिद्ध झाले. म्हणून त्यांना उर्वरित काळासाठी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य म्हणून अनर्ह ठरवण्यात आले आहे. तत्कालीन थेट सरपंच मंदाकिनी विष्णुपंत गोडसे यांना अपात्र ठरवल्यानंतर ताई बिन्नोर ह्या सरपंच झाल्या होत्या. अप्पर जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने त्या पायउतार झाल्या आहेत.
सरपंच ताई बिन्नोर यांचे पती माणिक बिन्नोर, सासरे निवृत्ती बिन्नोर यांच्या नावावर धनादेशाने ग्रामपंचायतीची रक्कम दिली गेली असल्याचा आरोप शिवाजी एकनाथ फोकणे यांनी केला होता. ह्या निवडणूक दाव्याची सुनावणी मालेगावच्या अप्पर जिल्हाधिकारी माया पाटोळे यांच्या न्यायालयात घेण्यात आली. प्रस्तुत प्रकरणी दोन्ही पक्षकारांना उचित संधी देऊन सुनावणीचे कामकाज करण्यात आले. उपलब्ध कागदोपत्री पुरावे, दोन्ही बाजूची भूमिका आदी बाबी विचारात घेऊन सरपंच ताई माणिक बिन्नोर यांना अनर्ह ठरवल्याचा आदेश काढण्यात आला आहे. घोटी खुर्द ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य पदावरून त्यांना अपात्र घोषित करण्यात आले आहे. यामुळे इगतपुरी तालुक्यात चर्चेला उधाण आले आहे.