विकासाभिमुख, सर्वगुणसंपन्न आणि विकासाचे मॉडेल उभे करणारे इगतपुरीचे माजी आमदार शिवराम झोले

भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – एकाच माणसात सुसंस्कार, सुसंस्कृत आणि सुस्वभाव याचा त्रिवेणीसंगम असणे अत्यंत दुर्मिळ आहे. याचसोबत वक्तृत्व, कर्तृत्व आणि नेतृत्व या तीनही गुणांचा संगम तर अगदीच अशक्य आहे. आध्यात्मिकता, लोकप्रियता आणि विद्वत्ता हे गुण तर लाखात एखाद्याच माणसात सापडतात. मात्र याला अपवाद ठरतात इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे माजी आमदार शिवराम शंकर झोले…! नमुद केलेले ९ गुण ह्या एकाच माणसात ठासून भरले आहेत. तब्बल दशकभर विधानसभा मतदारसंघाचे प्रभावी नेतृत्व करून जनसामान्य माणसांचा आणि आदिवासी बहुजनांचा बुलंद आवाज सभागृहात उठवण्यासाठी ते सुप्रसिद्ध आहेत. कृषी, शिक्षण, आरोग्य, क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक आदी क्षेत्रातील प्रश्नांची जाण असल्याने त्यांनी मांडलेले विकासाचे धोरण इगतपुरी तालुक्यासाठी वरदान ठरले. तत्कालीन काळात इगतपुरीच्या विकासाचा आलेख राज्याच्या नकाशावर अधोरेखित करणारे माजी आमदार शिवराम झोले आजही तरुणांना लाजवेल याप्रकारे सामान्य नागरिकांसाठी सदैव तत्पर आहेत. शिवराम झोले ह्या बहूगुणी, बहूआयामी गुणांच्या लोकप्रिय व्यक्तिमत्वाचा ७४ वा वाढदिवस साजरा करीत असतांना त्यांच्या कारकिर्दीचा विहंगम आढावा घेणे समयोचित ठरेल. १ जून त्यांच्या जन्मदिवसानिमित्त त्यांच्या कार्याचा गौरव करून त्यांना सर्वांतर्फे ह्या शब्दसुमनांच्या शुभेच्छा आहेत.  

तत्कालीन काळात अति दुर्लक्षित आदिवासी असणाऱ्या शेणवड खुर्द हे गाव शिवराम शंकर झोले यांच्यामुळे महाराष्ट्राला परिचित झाले. वडील कै. शंकर आणि आई कै. झुणकाबाई यांनी दिलेल्या मानवतेच्या शिकवणीनुसार बालपणापासूनच समाजाचे ऋण फेडण्यासाठी शिवराम झोले व्रतस्थ आहेत. सामान्य कुटुंबातील घटक असल्याने गरिबांच्या समस्याची संवेदना पूर्वीपासून त्यांच्या रक्तातच भिनून गेलेली आहे. गरिबीचा संघर्ष, पोटापाण्याची भ्रांत, शिक्षणासाठी खडतर परिस्थिती असतांनाही त्यांनी चांगले शिक्षण घेतले. त्यांच्यातील उगवते आणि खंबीर नेतृत्व तत्कालीन काळात लोकनेते स्व. गोपाळराव ( दादासाहेब ) गुळवे यांनी अचूक हेरले. हे गुण विकसित करून इगतपुरी तालुक्यातील लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी स्व. दादासाहेब गुळवे यांनी त्यांचा पाया भक्कम केला. एकीकडे समाजाचे प्रश्न मांडून ते प्रभावीपणे सोडवण्यासाठी शिवराम झोले हे तन, मन आणि धनाने सक्रिय होते. १९८५ मध्ये लोकांच्या प्रचंड आग्रहाखातर त्यांनी विधानसभा निवडणूक जिंकून आमदारकी मिळवली. १९९५ मध्ये ते सलग दुसऱ्यांदा आमदार झाले. आमदारकीच्या दोन्ही कार्यकाळात मतदारसंघातील विविध महत्वाचे प्रश्न सोडवून विकासाचे फळ लोकांना चाखायला दिले. इगतपुरी मतदारसंघात त्यांनी केलेले शाश्वत विकासाचे कार्य आजही सर्वांना दिसून येईल. आदिवासी विकास महामंडळाचे संचालक म्हणून २५ वर्ष, जिल्हा परिषद सदस्य म्हणून १० वर्ष, टाकेद आदिवासी सोसायटी संचालक आणि सध्या इगतपुरी तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमनपद शिवराम झोले भुषवत आहेत. याद्वारे जनसंपर्कात राहून लोकांचे प्रश्न, अडचणी सोडवण्यासाठी ते चांगलेच सक्रिय आहेत.

शेतकऱ्यांच्या भाताला चांगला भाव मिळावा, धरणांतील हक्काचे पाणी शेतकऱ्यांना मिळावे यासाठी ते कायम लढत आहेत. यासाठी घोटी ग्रामीण रुग्णालय निर्मिती, घोटी मुले नंबर दोन शाळा, ग्रामपंचायत इमारती, शासकीय इमारती, अंगणवाड्या, आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र आदी विकास माजी आमदार शिवराम झोले यांच्या पाठपुराव्यामुळे झालेला आहे. शिक्षणाशिवाय लोकांची शाश्वत प्रगती होणार नाही. यासाठी शिक्षणाची कवाडे उघडायला हवीत. या धोरणामुळे शिवराम झोले यांनी १९९३ मध्ये निनावी येथे लोकनेते कै. गोपाळराव गुळवे विद्यालय उभे केले. यामाध्यमातून आदिवासी भागात ज्ञानगंगा पोहोचून समृद्ध पिढीचे निर्माण व्हायला योगदान मिळाले आहे. आजही न थकता, न दमता आणि न कंटाळता माजी आमदार शिवराम झोले यांच्याकडून सामान्य माणसांसाठी काम सुरूच आहे. २४ तास लोकांच्या सेवेसाठी उपलब्ध असणारे शिवराम झोले इगतपुरी त्र्यंबकेश्वर तालुक्याचे अव्वल स्थानी असणारे आदर्श आणि प्रेरणादायी नेतृत्व आहे. ७४ वा वाढदिवस व अमृतमहोत्सवी वाढदिवसाचा आरंभ सगळीकडे सामाजिक कार्याने साजरा होतोय. नव्या पिढीला उमदे, सर्वगुणसंपन्न आणि खंबीर नेतृत्व कसे असावे याची प्रेरणा देणारे माजी आमदार शिवराम झोले यांना त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कोटी कोटी शुभेच्छा..!

Similar Posts

error: Content is protected !!