इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यात पंचायत समिती अंतर्गत पशुवैद्यकीय विभागात अनेक जागा रिक्त असल्याने पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना अतिरिक्त काम करावे लागते आहे. तालुक्यात १४ पशु वैद्यकीय दवाखाने असून यात परिचर व कर्मचाऱ्यांची वाणवा असल्याने शेतकऱ्यांना जनावरांच्या उपचारासाठी खासगी डॉक्टर शोधावे लागतात. यामुळे शेतकऱ्यांना जास्त भुर्दंड सोसावा लागतो. म्हणून नाशिक जिल्हा परिषदेने इगतपुरी तालुक्यातील रिक्त जागा तात्काळ भराव्यात अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा स्वराज्यचे इगतपुरी तालुका संघटक कृष्णा गभाले, दत्ता कोकणे, अजिंक्य अण्णा चुंबळे युवा फाउंडेशन, गौरव गभाले, शाखाप्रमुख योगेश सूरुडे, काँग्रेस नेते उमेश सुरुडे, सचिन गभाले, गोरख मदगे, प्रशांत सुरुडे, श्रीराम गभाले, हरिश्चंद्र गभाले, किरण गायकवाड, प्रशांत गभाले, योगेश गभाले, ईश्वर गायकर, शुभम गभाले, सौरभ गभाले, वासुदेव मोडक आदींनी दिला आहे.
इगतपुरी पं. स. अंतर्गत पशुधन विकास अधिकारी ( विस्तार ), पशु वैद्यकीय दवाखाना गिरणारे येथील पशुधन विकास अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक काळूस्ते, फांगुळगव्हाण ही पदे रिक्त आहे. आठ पशुवैद्यकीय दवाखान्यात परिचर पद रिक्त आहे. शेतीसह अनेक शेतकरी दुग्धव्यवसाय करीत आहे. यामुळे दुधाळ जनावरांची संख्या वाढत असून ह्या व्यवसायाकडे अनेकजण वळले आहेत. त्यांच्या जनावरांची काळजी घेण्यासाठी मार्गदर्शन नसल्यामुळे जनावरांना विविध रोग होऊन जनावरे दगावण्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. जनावरांना जंतनाशक औषधे, गोचीड निर्मूलन, वंध्यत्वावर उपचार, आहाराचे मार्गदर्शन देण्यात येते. मात्र जनावरांची विशेष काळजी घेण्यासाठी पशु वैद्यकीय विभागात मनुष्यबळाचा अभाव आहे. इगतपुरी तालुक्यात हजारो लिटर दुधाचे संकलन केले जाते. गाभण गाई, म्हशी, जन्मणारे पारडे आदींना तात्काळ उपचार मिळत नाही. परिणामी खाजगी डॉक्टरांना बोलवावे लागते.