
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथील टांगा शर्यतीत बाजूला उभे राहून शर्यत पाहणाऱ्या शौकीन व्यक्तीचा टांगा अंगावर आल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. पोपट कचरु मुंजे वय ५२ वर्षे रा. सारुळ, ता. जि. नाशिक असे ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. सारूळ परिसरात सामाजिक कार्यात ते नेहमीच अग्रेसर होते. आज सायंकाळी ५ वाजता मुंढेगाव येथील प्रसिद्ध टांगा शर्यत पाहण्यासाठी ते आले होते. बाजूला उभे राहून शर्यत पाहत असतांना भरधाव टांगा अचानक त्यांच्या अंगावर आला. यावेळी त्यांच्या डोक्यावर व उजव्या कानावर जबर मार लागुन ते ठार झाले. सारूळचे सरपंच मोहन लक्ष्मण डगळे यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल धुमसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार श्रीकांत दोंदे आणि पोलिसांनी सुरु केला आहे. पोपट मुंजे यांच्या निधनाबद्धल सारूळ परिसरात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.