१९९ प्राथमिक शिक्षकांना निवडश्रेणीचा लाभ मंजूर : बीईओ निलेश पाटील यांच्या प्रयत्नांनी ह्या महिन्यापासून मिळणार लाभ

इगतपुरीनामा न्यूज – प्राथमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, नाशिक अंतर्गत कार्यरत इगतपुरी तालुक्यातील १९९ प्राथमिक शिक्षकांना निवडश्रेणी मंजूर करण्यात आलेली आहे. एकाच पदावर प्रशिक्षित पदाच्या शैक्षणिक अर्हतेसह पदवी संपादन करुन सलग २४ वर्षे अर्हताकारी सेवा पूर्ण करणाऱ्या प्राथमिक शिक्षकांना निवडश्रेणीसाठी विचारात घेण्यात येते. प्राथमिक शिक्षकांना निवडश्रेणी मंजूरीकामी शासन निर्णय दि. ११ फेब्रुवारी १९९१ नुसार त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्यात आलेली आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी असिमा मित्तल, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र परदेशी, शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव यांच्या समितीने प्रस्ताव मंजूर केले. शासन नियमांनुसार विहीत निकषांची पूर्तता करणाऱ्या प्राथमिक शिक्षकांना निवडश्रेणी मंजूर करण्यात आली. इगतपुरीचे गटशिक्षणाधिकारी निलेश पाटील यांनी मे महिन्यापासून निवडश्रेणी मंजूर झालेल्या शिक्षकांच्या वेतनात त्याचा लाभ दिला आहे. ह्या प्रकियेत गटशिक्षणाधिकारी निलेश पाटील यांनी लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीतही शिक्षकांसाठी अथक परिश्रम घेतले. श्री. भिडे, कार्यालय अधीक्षक निलेश पाटील, प्रदीप अहिरे, श्री. भागवत, सर्व शालार्थ टीम यांनी त्यांना मोलाचे साहाय्य केले. आपले गटशिक्षणाधिकारी निलेश पाटील यांच्या तत्पर कार्यवाहीमुळे आपल्या १९९ शिक्षकांना निवडश्रेणीचा फायदा मिळाला आहे. निलेश पाटील यांच्यासह या कामात योगदान देणाऱ्या प्रत्येक घटकाचे आम्ही ऋण व्यक्त करतो अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीचे नाशिक जिल्हा संपर्कप्रमुख जनार्दन कडवे यांनी दिली.

Similar Posts

error: Content is protected !!