इगतपुरीनामा न्यूज, दि. ६
रस्ते विकासासाठी अत्यंत उपयुक्त असतात. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी ग्रामीण रस्ते म्हणजे जीवनवाहिनी आहे. मात्र रस्त्याची सुविधा नसेल तर शेतकऱ्यांना आपला दर्जेदार शेतीमाल बाजारपेठेत पोहोचवता येत नाही. यामुळे निर्माण होणारे नैराश्य अप्रगत करीत असते. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर इगतपुरी तालुक्यातील नागोसली येथे शेतकऱ्यांनी एकत्र येऊन रस्त्याचे काम केले आहे. गावापासून ते स्मशानभूमी भागात जाणाऱ्या १ किमी रस्ताला गेल्या २० वर्षांपासून कामाची प्रतीक्षा होती. मात्र ह्या परिसरातील शेतकऱ्यांना यामुळे विविध अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यानुसार येथील शेतकऱ्यांनी स्वतः पुढाकार घेऊन नागोसली गाव ते स्मशानभूमी रस्त्याचे काम पूर्ण केले आहे.
लोकवर्गणी काढून केलेल्या रस्त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना फायदा होणार असून स्मशानभूमीकडे सुद्धा जायला चांगला मार्ग मिळणार आहे. ह्या रस्त्याच्या कामासाठी शेतकरी ज्ञानेश्वर जोंधळे, शाम शिंदे, देवराम राऊत, पोलीस पाटील कुंडलिक ताठे, कैलास ताठे, दत्तू शिंदे, गजीराम जोंधळे, संजय होले, सुखा होले, गिरीधर शिंदे, राजू शिंदे, जयेश जोंधळे, गोविंद रातड, माया शेलार, रामदास होले आदी शेतकऱ्यांनी पुढाकार घेऊन काम पूर्ण करून घेतले. ह्या रस्त्याच्या भक्कम कामासाठी शासनाच्या निधीतून काम होणे आवश्यक असल्याने पालकमंत्री ना. छगन भुजबळ यांना साकडे घालण्यात येणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.