इगतपुरी तालुक्यातील पाणी प्रश्न आणि टंचाईचा प्रश्न तात्काळ सोडवावा – नारायण राजेभोसले

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यात धरणांचे पाणी आरक्षित असतांना कडवा, दारणा, मुकणे, भावली, कोरपगाव ह्या धरणांचे पाणी येवला, कोपरगाव, सिन्नर येथील बलाढ्य नेत्यांनी पळवले आहे. यामुळे सर्व धरणे कोरडी होत आहेत. मात्र इगतपुरी तालुक्यातील नेते मंडळी कधीच पाण्याबाबत कुठेही आवाज उचलताना दिसत नाही असा घणाघाती आरोप शेतकरी नेते नारायण राजेभोसले यांनी केला आहे. लोकसभेच्या रणधुमाळीत कार्यकर्ते व नेते मंडळींनी वाड्यापाड्यावर जाऊन जोरदार प्रचार केला. मतदारांनीही त्यांचा अधिकार बजावला. पण उन्हाच्या तडाख्याने व धरणांनी गाठलेल्या तळाने वाड्यापाड्यातील मतदारांचा घसा मात्र कोरडा पडला आहे. कार्यकर्ते व नेत्यांचे लक्ष नसल्याने धरणाखालच्या नेत्यांनी पाणी मात्र खाली नेले. त्यामुळे तालुक्यात दुष्काळ परिस्थिती ओढवलेली आहे. याला इगतपुरी तालुक्यातील प्रशासन व नेते मंडळी आहे. निवडणुका संपल्या मात्र प्रशासनाने पाणी टंचाईबाबत आढावा बैठक अजून घेतलेली नाही. नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी आवाज उचलून प्रशासनाकडे मुबलक पाण्याची ट्रॅकरद्वारे त्वरित मागणी करावी. पाण्याची समस्या सोडवण्यासाठी नेते मंडळी यांनी जबाबदारी घेऊन आवाज उठवावा. धरणे, नद्या कोरड्या झाल्याने शेतकऱ्यांची पिके वाळली आहेत. वाड्या पाड्यांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी वणवण करावी लागत आहे. नेते मंडळी व पुढाऱ्यांनी पाणी टंचाईबाबत प्रशासनाला मागणी करून उपाययोजना करावी असे नारायण राजेभोसले यांनी सांगितले.

Similar Posts

error: Content is protected !!