
इगतपुरीनामा न्यूज – खासदार सैनिक होऊ शकत नाही परंतु एक सैनिक खासदार होऊन देशाची सेवा नक्कीच करू शकतो. जनतेचे विविध प्रश्न, समस्या सोडवू शकतो. अधिकाधिक मते देऊन मला सेवेची संधी द्यावी असे आवाहन नाशिक मतदारसंघातील सैनिक समाज पार्टीच्या उमेदवार जयश्री महेंद्र पाटील यांनी केले आहे. देशासाठी जीवाची बाजी लावून सैनिक लढतात, त्याकामी त्यांच्या कुटुंबाचेही तितकेच योगदान असते. त्यांच्या त्यागाची प्रत्येक क्षणाला आठवण होते. प्राणाची आहुती देणाऱ्या सैनिकांचा नेहमी सन्मान करून माजी सैनिकांसाठी म्हाडाच्या धर्तीवर घरकुलाचा प्रश्न सोडवणार आहे. आदिवासी दुर्गम भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न नेहमीच पाचवीला पुजलेला आहे. महिला भगिनींची होणारी पायपीट थांबवण्यासाठी कसोशीने प्रयत्न करणार आहे. ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना होणे गरजेचे आहे. अन्नदाता शेतकऱ्याला किमान आधारभूत किंमत मिळवून देणार असून रोजगार, शिक्षण आरोग्य आदींवर भर असल्याचे त्यांनी सांगितले. “अबकी बार सैनिक सरकार” ह्या घोषणेला प्रतिसाद मिळत असून यातून माजी सैनिकांनी त्यांना पाठिंबा घोषित केला आहे. त्यांची निशाणी द्राक्ष असून त्यांना प्रचंड बहूमतांनी विजयी करा असे आवाहन करण्यात आले आहे. त्यांचे पती महेंद्र पाटील हे भारतीय नौदलात २० वर्षे कार्यरत राहून देशसेवा केली आहे. ते सेवानिवृत्त झाल्यानंतर बँकेत व्यवस्थापक पदावर कार्यरत असून गोरगरिबांची सेवा करीत आहे.