सांजेगावचा कथित राजकीय पदाधिकारी युवक नाशिक पोलिसांच्या जाळ्यात : ४ कोटीचे दागिने चोरी प्रकरणी संशयित ताब्यात

इगतपुरीनामा न्यूज – नाशिकच्या गंगापूररोड येथील आयसीआयसीआय होम फायनान्स बँकेतील दागिने चोरीची नाशिक स्थानिक गुन्हे शाखा विभाग एकने उकल केली आहे. पोलिसांनी संशयित आरोपीकडून ३९ लाख रुपयांच्या सोन्याच्या दोन लगड जप्त केल्या. मुख्य संशयित आरोपी वैभव लहामगे सराईत गुन्हेगार आहे. इगतपुरी तालुक्यात महामार्गावर कुस्तीगिर युवकावर गोळ्या झाडत कोयत्याचा वार करुन झालेल्या खुनात त्याचा सहभाग उघड झाला आहे. गुन्हे शाखेने ह्या बँकेत स्वच्छतेचे काम करणारा तुकाराम देवराम गोवर्धने वय ३५, मूळ रा. सांजेगाव, ता. इगतपुरी सध्या रा. उत्तमनगर याला अटक केली आहे. त्याने यापूर्वी तपासाच्या वेळी चौकशी केल्यावर पोलिसांना विसंगत माहिती दिल्याने पोलिसांचा संशय बळावला. तुकाराम देवराम गोवर्धने याने संशयित वैभव लहामगे या त्याच्या गावातील मित्राला बँकेची माहिती, खिडकी, तिजोरीची जागा, सीसीटीव्ही, भोंगा यासह इतर माहिती पुरविली असल्याचे पोलिसांनी निष्पन्न केले आहे. संबंधित संशयिताने यापूर्वी एका राजकीय पक्षात पदाधिकारी म्हणून काम केलेले आहे. त्याच्या गुन्ह्यातील सहभागामुळेच दोन महिने पाहणी करुन संशयिताने बँकेत चोरी करण्याची योजना आखली. संशयित वैभव लहामगे याने सतीश कैलास चौधरी, रतन जाधव, रा. सिडको यांच्यासह चोरी केली. संशयित सतीश चौधरीची आई रेखा कैलास चौधरी हिच्याकडून चोरीतील ३९ लाख ५२ हजार ३५० रुपयांचे वितळलेले सोने पोलिसांनी जप्त केले. तुकाराम देवराम गोवर्धने याला न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या घटनेत आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनीची खिडकी उघडून चोरट्यांनी चार कोटीहून अधिक किंमतीचे दागिने लंपास केले होते. वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक तैनात करण्यात आले होते. सात दिवसाच्या तपासात बँकेमधील कर्मचाऱ्यांची चौकशी करून सीसीटीव्ही चित्रण तपासण्यात आले. सांजेगाव येथील उत्तर महाराष्ट्र केसरी पहिलवाल भूषण लहामगे याच्या हत्या प्रकरणतील संशयित त्याचा चुलतभाऊ वैभव लहामगे याने भूषणची हत्या करण्यापूर्वी  बँकेत पाच कोटींच्या दागिने लूटल्याचे तपासात उघड झाले. त्यामुळे एकाचवेळी दोन गुन्ह्यांची उकल झाली असून पोलीस वैभव लहामगेची कसून चौकशी करीत आहेत. जमिनीसह आर्थिक वादातून भूषणची हत्या केल्याचे तपासात समोर येत आहे.

Similar Posts

error: Content is protected !!