बिबट्याच्या हल्ल्यातील गंभीर जखमी बालकाने घेतला अखेरचा श्वास : अद्यापही बिबट्या जेरबंद करण्यास अपयश

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील उंबरकोन येथील तीन दिवसापुर्वी बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी प्रविण सारूक्ते वय ११ ह्या बालकाचा आज सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास त्याची प्राण ज्योत मालवली. नाशिकच्या रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. तीन दिवसांपासून बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाच्या १३० अधिकारी कर्मचाऱ्यांनी दिवस रात्र एक करीत शोध घेतला. मात्र अजूनही बिबट्या जाळ्यात अडकला नाही. काल मध्यरात्री ३ वाजेपर्यंत वनविभागाने संपूर्ण परिसर पिंजून काढला मात्र यश आले नाही. आज सकाळपासून वनविभागाने श्वान पथक, ड्रोन कॅमेऱ्याद्वारे पुर्ण परिसर पिंजून काढत त्यांनी बिबट्या असलेल्या परिसरात फटाके फोडून पाहिले. मात्र बिबट्याची कोणतीही हालचाल आढळून आली नाही अथवा बिबट्या दिसला नाही. त्यामुळे वनविभाग आजूबाजूच्या गावातील परिसरही पिंजून काढत आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी केतन बिरारीस यांनी आवाहन केले आहे की, बिबट्या हा गेल्या तीन दिवसांपासून उपाशी असून तो इकडे तिकडे फिरत आहे. त्यामुळे तो चवतळला असून गावातील कोणत्याही नागरिकांनी त्याच्यामागे दगड अथवा काठ्या घेऊन मागे धावु नये. त्यामुळे बिबट्याला जेरबंद करण्यास अडचणी येणार आहेत. नागरिकांनी वन विभागाला सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले आहे. बिबट्याच्या हल्ल्यात वनविभागाचे ६ कर्मचारी व ६ ग्रामस्थ गंभीर जखमी झाले आहेत. घटनास्थळी वनविभागाने बिबट्याला पकडण्यासाठी चार पिंजरे लावले आहेत.

Similar Posts

error: Content is protected !!