भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. चौरंगी दिसणारी लढत शेवटी दुरंगी होईल अशी चिन्हे आहेत. महाविकास आघाडी, महायुती, वंचित बहुजन आघाडी आणि अपक्ष शांतिगिरी महाराज आदी उमेदवार लोकांपर्यंत पोहोचत आहेत. प्रत्येकजण आपला उमेदवार निवडून यावा यासाठी सक्रिय झाला आहे. २० तारखेला अधिकाधिक मतांचे दान आपल्या पदरात पडावे यासाठी प्रयत्न होताहेत. जास्तीतजास्त लोकांनी मतदान करावे यासाठी यंत्रणा सुद्धा सर्वांगीण प्रयत्न करीत आहेत. पोलीस यंत्रणा, निवडणुक यंत्रणा सगळीकडे लक्ष ठेवत असून गैरप्रकार रोखण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहे. दमछाक करणारा कडक उन्हाळा सर्वच उमेदवारांचा घाम काढत असून कार्यकर्त्यांची फौज सांभाळणे सुद्धा कठीण झाले आहे. उमेदवाराची डोळेझाक करून कार्यकर्त्यांना समजावले जात असले तरी कार्यकर्त्यांच्या मनातील खदखद पराभवाला कारणीभूत ठरू शकते.
शिवसेना उबाठा गट, इं. काँ., रा. काँ शरद पवार गट आणि मित्रपक्षांच्या महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी तिकीट घोषित झाल्यापासून ते आतापर्यंत प्रचाराची चांगलीच खिंड लढवल्याचे दिसते. मतदार संघातील कार्यकर्त्यांचे अभेद्य जाळे आणि दांडगा जनसंपर्क असल्याने सध्यातरी राजाभाऊ वाजे यांची मशाल घराघरात पोहोचली आहे. प्रचाराचे सुसंगत नियोजन, कार्यकर्त्यांचे व्यवस्थापन आणि मतदारांशी सुसंवाद या त्रिसूत्रीमुळे एकतर्फी लढतीचे चित्र निर्माण झालेले आहे. गवगवा न करता नि:स्वार्थी आणि प्रामाणिकपणाने राजाभाऊ वाजे यांचा प्रचार कार्यकर्ते करत आहेत. गावोगावी राजाभाऊ वाजे यांची मशाल निशाणी पोहोचवण्यासाठी पदरमोड करून कार्यकर्ते जीवाचे रान करताहेत. दुसरीकडे विरोधी उमेदवारांच्या माणसामुळे नाराज “सैनिक” यांनी थांबल्याची भूमिका घेतली आहे. राजाभाऊ वाजे यांना खासदार करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले जात असून त्याचा फायदा सूक्ष्म नियोजन करणाऱ्या लोकांना झाला आहे. जनसेवक बिरुद असणारे राजाभाऊ वाजे हे सामान्य कार्यकर्त्यांच्या थेट संपर्कात असल्याने त्याचा फायदा जूनमधील निकाल एकतर्फी लागणार असल्याचा संकेत देत आहेत. विरोधी उमेदवार त्या त्या तालुक्यातील मतदारांनी हाणून पाडलेल्या लोकांना साथ देत असल्याने चित्र एकतर्फी निर्माण झाले आहे.