इगतपुरीनामा न्यूज – मनुष्याच्या भाव भावना, पशु पक्षी आणि प्राण्यांच्या चेहऱ्यावरील संवेदना, पर्यावरणाचा ऋणानुबंध यासह आध्यत्मिक प्रेरणादायी भावनांचे वास्तवदर्शी चित्र काढणारी इगतपुरीची चित्रकार तरुणी श्रुती सुभाषचंद जैन समदडिया आणि घोटीची क्रिष्णा भरतभाई पटेल या दोघींनी दर्दी नाशिककरांची मने जिंकली. नवकार आर्ट फाउंडेशनतर्फे नाशिक येथे ४ दिवसांपासून मनमोहक चित्रांचे प्रदर्शन सुरु आहे. यामध्ये ५० पेक्षा जास्त चित्रकारांनी सहभाग घेतलेला आहे. यापैकी श्रुती आणि क्रिष्णा या दोघींचे भेटी देणाऱ्या विविध मान्यवरांनी विशेष कौतुक केले आहे. नवकार कला फाउंडेशनच्या उदघाटनप्रसंगी उद्योगपती अशोकशेठ कटारिया, मुरलीधर लाहोटी उपस्थित होते. चित्रकार शेफाली भुजबळ यांनीही दोघींच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली. इगतपुरी सारख्या दुर्गम आदिवासी तालुक्यातील ह्या दोन्ही चित्रकार युवतींच्या कलात्मकतेबद्धल सगळीकडे अभिनंदन सुरु आहे. विविध प्रकारच्या विषयामधून अनेक कंगोरे उलगडणारे मोहक चित्र काढण्यात श्रुती जैन, क्रिष्णा शाह ह्या पारंगत आहेत. श्रुतीचे वडील सुभाषचंद जैन समदडिया, आई कंचन समदडिया, क्रिष्णाचे वडील भरतभाई पटेल, आई भावना पटेल यांच्या प्रोत्साहन आणि आशिर्वादामुळे कलाक्षेत्रात गगनभरारी घेण्याची शक्ती मिळत आहे असे दोघींनी सांगितले. लहानपणापासून अभ्यासासोबत चित्र काढण्याचा छंद त्यांना आनंद देऊन जातो. आतापर्यंत अनेक प्रकारची चित्रे त्यांनी काढली असून राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील बक्षिसे पटकावली आहेत. राज्यभरातील विविध प्रदर्शनामध्ये नाशिकसह घोटी, इगतपुरीचे नाव उंचावण्यात श्रुती आणि क्रिष्णा यांचा हातभार लागतो आहे. नाशिकला सुरु असलेल्या प्रदर्शनात ह्या दोघींच्या चित्रांचा चांगलाच बोलबाला आहे.
Similar Posts
error: Content is protected !!
WhatsApp us
Join WhatsApp Group