इगतपुरीनामा न्यूज – आजच्या तीव्र स्पर्धेच्या युगामध्ये अर्थप्राप्तीसाठी केवळ नोकरीवर विसंबून न राहता त्याला पूरक व्यवसायाची जोड द्यावी. विविध व्यावसायिक कौशल्ये आत्मसात करून आत्मनिर्भर होण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपली क्षमता ओळखावी. व्यवसायात यशस्वी होण्यासाठी यशस्वी झालेल्या उद्योजकांचे योग्य मार्गदर्शन मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत. सूक्ष्म अभ्यास करून सहज करता येणारे शेकडो व्यवसाय नव उद्योजकांची वाट पाहत असल्याने संधीचे सोने करावे असे मार्गदर्शन माणदेशी फाऊंडेशन नाशिक शाखेच्या समन्वयक सत्यवती गुंजाळ यांनी केले. नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित इगतपुरी येथील कला व वाणिज्य महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ‘आजीवन अध्ययन व विस्तार’ विभागांतर्गत ‘व्यवसाय मार्गदर्शन’ कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना बंदिस्त शेळीपालन, पेपर द्रोण तयार करणे, केक बनविणे इत्यादी व्यवसायांची माहिती आणि तयार झालेल्या उत्पादनाची जाहिरात कशी करावी याविषयी बहुमोल मार्गदर्शन केले. माणदेशी फाऊंडेशनच्या महिला सबलीकरणाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. नवीन व्यवसायासाठी माणदेशी फाऊंडेशनच्या अर्थसहाय्य योजनेची विद्यार्थ्यांना माहिती दिली. माणदेशी फाऊंडेशनच्या प्रशिक्षक ज्योती चव्हाण यांनी विद्यार्थिनींना ‘ब्युटी पार्लर कोर्स’ विषयी प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखवले. प्रास्ताविक सहा. प्रा. आर. इ. नाडेकर यांनी तर सूत्रसंचालन सहा. प्रा. एम. आर. झाडे यांनी केले. व्यासपीठावर महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रतिभा हिरे, समन्वयक डॉ. बी. एच. घुटे उपस्थित होते. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
Similar Posts
error: Content is protected !!
WhatsApp us
Join WhatsApp Group